महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका मतदानाच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि 'पाडू' (PADU) यंत्रणेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगावर सरकारला अनुकूल काम करत असल्याचा ठपका ठेवत मनसैनिक आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही ठाकरे कुटुंबीय आज मकरसंक्रांतीनिमित्त राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी एकत्र जमले होते.
निवडणूक आयोगाच्या 'त्या' नोटिफिकेशनवर आक्षेप
राज ठाकरे यांनी मतदानाच्या एक दिवस आधी मतदारांच्या भेटीगाठी घेण्याबाबतच्या नवीन नियमावर प्रश्न उपस्थित केले. राज ठाकरे यांनी म्हटलं की, सरकारला मदत करण्यासाठी निवडणूक आयोग काम करत आहे. आम्ही जेवढ्या निडणुका पाहिल्या त्यात प्रचार संपला की दुसरा दिवस रिकामा असतो आणि तिसऱ्या दिवशी मतदान पार पडतं. मात्र आता निवडणूक आयोगाने नवीनच काढली आहे, की दुसऱ्या दिवशी 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटता येईल, मात्र पत्रके वाटता येणार नाहीत. असा नियम कशासाठी? याचा अर्थ तुम्ही पैसे वाटू शकता असा होतो का?" असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाचा हा जुना नियम असेल तर हा नियम लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत का नव्हता? केवळ याच निवडणुकीसाठी नियम का बदलले जात आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला.
(नक्की वाचा- Holiday News: राज्यातील 29 शहरांमध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; वाचा शहरांची संपूर्ण यादी)
'पाडू' (PADU) मशीन बाबत राजकीय पक्षांना सांगितलंच नाही
मतमोजणीत तांत्रिक बिघाड झाल्यास वापरल्या जाणाऱ्या PADU (Printing Auxiliary Display Unit) यंत्रणेवर राज ठाकरेंनी संशय व्यक्त केला आहे: "पाडू नावाचे मशीन आणले आहे, पण ते कोणत्याच राजकीय पक्षाला दाखवलेले नाही. हे मशीन नेमके काय आहे, ते कसे काम करते, हे सांगण्याची तसदीही आयोगाने घेतलेली नाही", असं राज ठाकरेंनी म्हटलं.
या पाडू मशीनबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे, मात्र आयोगाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. या मशीनमुळे मतदानात गडबड होणार नाही, याची खात्री कोण देणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
(नक्की वाचा- Holiday News: राज्यातील 29 शहरांमध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; वाचा शहरांची संपूर्ण यादी)
कार्यकर्त्यांना सतर्कतेचा आदेश
राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि युतीमधील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. आपल्या बूथमध्ये आणि प्रभागात काय सुरू आहे, याकडे कार्यकर्त्यांनी बारकाईने लक्ष द्यावे.
"निवडणूक आयोग सरकारला जे हवे ते करून देण्यासाठी काम करत आहे का? रोज कायदे बदलणे हा काय प्रकार आहे? हारलेली निवडणूक जिंकण्यासाठी सरकारला मदत करण्यासाठी निवडणूक आयोग काम करत असल्याचा आरोप करत ही 'बेबंदशाही' असल्याची टीका देखील राज ठाकरेंनी केली.