
शिवडी-वरळी उन्नत मार्गामधील एलफिस्टन ब्रिज परिसरातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन त्याच परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केला आहे. लक्ष्मी निवास व हाजी नुरानी चाळ या बाधीत इमारतींमधील एकूण 83 प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आता त्याच परिसरात होणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हा प्रस्ताव मान्य केल्यामुळे बाधीत इमारतींमधील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
वरळी-शिवडी कनेक्टर उभारणीसाठी एलफिस्टन ब्रिज पाडण्यात येणार आहे. पिलर उभारणी करताना लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या दोन इमारती बाधीत होणार आहे. या दोन इमारतींमधील रहिवाशी प्रकल्पग्रस्तांची त्याच परिसरात म्हाडाकडे उपलब्ध असलेल्या सदनिकांमध्ये पुनर्वसनाची मागणी होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हाडामधील आजूबाजूच्या परिसरातील सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. लक्ष्मी निवास इमारतीमधील 60 प्रकल्पग्रस्त आणि हाजी नुरानी चाळमधील 23 प्रकल्पग्रस्त अशा एकूण 83 प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आता त्याच परिसरात होणार आहे.
यापूर्वी या प्रकल्पासाठी एकूण 19 इमारती बाधित होणार होत्या. पण MMRDAने रचनात्मक बदल करून 17 इमारती प्रकल्पाच्या मार्गामुळे बाधित होणार नाही याची काळजी घेतली आणि मार्ग बदलला. ज्यामुळे केवळ रहिवाशांचे पुनर्वसन सुलभ झाले नाही तर पुनर्वसनावर होणारा 5200 कोटी रुपयांचा खर्च वाचवला. तसेच, या निर्णयामुळे प्रकल्पाची गती वाढून तो निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकेल. पुनर्वसनाचे निकष:300 चौ.फु. पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या घरमालकांना 300 चौ.फु. + 35% अतिरिक्त क्षेत्र = एकूण 405 चौ.फु. क्षेत्राची सदनिका देण्यात येणार. 300 ते 1292 चौ.फु. क्षेत्रामधील घरमालकांना विद्यमान क्षेत्र + 35% अतिरिक्त क्षेत्रफळ प्रमाणे नवे घर दिले जाणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world