राहुल कांबळे, नवी मुंबई
महिलेसोबत गैरवर्तन आणि विनयभंग केल्याप्रकरणी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेलमधील खांदेश्वर परिसरात पिलाई कॉलेजजवळ ही घटना घडली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती खांदेश्वर पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोहित गोपाल गडे (वय 30 वर्ष) असे आहे. तो रिक्षाचालक असून, सदर घटनेच्या वेळी त्याचे वर्तन अत्यंत आक्रमक व बेकायदेशीर असल्याचे पीडितेच्या तक्रारीवरून स्पष्ट झाले आहे.
(नक्की वाचा- 300 सोन्याचे शिक्के, 70 लाखांची कार, तरीही भरलं नाही सासरच्यांचं पोट, विवाहित महिलेचा टोकाचा निर्णय)
घटनेबद्दल सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार महिला आपल्या मैत्रिणीसोबत पिलाई कॉलेजच्या रस्त्याने चालत असताना आरोपी गडे याच्या रिक्षाने त्यांना धडक दिली. यानंतर पीडित महिलेने त्याच्याकडे वाहन बेधडक चालवण्याबाबत जाब विचारला असता, आरोपी संतप्त झाला. त्याने रिक्षामधून खाली उतरून पीडितेला जबरदस्तीने ओढले, तिच्या अंगावर हात ठेऊन अश्लील हावभाव केले व शिवीगाळ करत "तुला चाकूने मारेल" अशी धमकीही दिली. या प्रकारामुळे पीडित महिला प्रचंड घाबरली व तिने लगेचच खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे लगेचच गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
( नक्की वाचा : Nalasopara : 32 लाखांच्या बदल्यात घेतले 4 फ्लॅट, पोलिसांच्या जाचाला कंटाळून बिल्डरचा टोकाचा निर्णय )
खांदेश्वर पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74 (महिलेचा विनयभंग करण्यासाठी मारहाण किंवा शक्तीचा वापर) आणि कलम 75 (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, "घटना गंभीर स्वरूपाची असून पीडितेच्या निवेदनानुसार आरोपीने केवळ अश्लील वर्तनच नाही केले, तर तिला शारीरिक इजा करण्याची धमकीही दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल."
खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. आरोपीचा याआधीचा गुन्हेगारी इतिहास आहे का याचाही शोध घेतला जात आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याची प्रक्रिया देखील पोलिसांना सुरु केली आहे