Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील कमबॅकवरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारवर टोलेबाजी करण्यात आली आहे.
भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाने अनेकांची शोकांतिका झाली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचे भुजबळांच्या मांडीशी वैर होते. मात्र आता भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एण्ट्रीने स्वतःची मांडी खाजविण्याऐवजी यापुढे या दोघांना भुजबळांची मांडी खाजवावी लागेल. एकनाथ शिंदे यांच्या जीवनातला हा अत्यंत कसोटीचा क्षण असल्याची टीकाही, 'सामना'तून करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे भुजबळांच्या मांडीशी वैर होते. मंत्रिमंडळात भुजबळांची ‘मांडी' नको हा त्यांचा पण होता. मात्र आता भुजबळांची मंत्रिमंडळात एण्ट्री झाली आहे. त्यामुळे स्वतःची मांडी खाजविण्याऐवजी यापुढे या दोघांना भुजबळांची मांडी खाजवावी लागेल. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या जीवनातला अत्यंत कसोटीचा क्षण आला आहे व त्याबद्दल त्यांनी त्यांचे पक्षप्रमुख अमित शहा यांच्या दारात जाऊन हैदोस घातला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतले आहे व एकनाथ शिंदे यांना यापुढे भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना वेदना कशा होत नाहीत? लाज कशी वाटत नाही? वगैरे प्रश्न तेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना विचारत होते", अशी आठवण सामनातून करून दिली आहे.
(नक्की वाचा- Chhagan Bhujbal: छगन भुजबळांचे मंत्रिमंडळात कमबॅक! महायुतीने काय साधलं? वाचा 5 मोठे मुद्दे)
शिंदे व त्यांच्या लोकांना इशारा
"शिंदे वगैरे लोकांनी शिवसेना सोडून अमित शहांचे नेतृत्व स्वीकारले त्यामागे जी कारणे दिली त्यात भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणे जमणार नाही हे मुख्य कारण होते. शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्यांच्या वाऱ्यालाही उभे राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आता शिंदे यांची अशी कोंडी अमित शहा व फडणवीस यांनी केली आहे की, शिवसेनाप्रमुखांवर खऱ्या निष्ठा असतील तर राजीनामा द्या, नाहीतर मंत्रिमंडळात भुजबळांच्या मांडीवरचे केस उपटत दिवस ढकला. भुजबळ यांच्या शपथविधी सोहळ्य़ाला शिंदे यांनी हजेरी तर लावलीच शिवाय शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या मांडीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला. भुजबळ यांचा मंत्रिमंडळात प्रवेश हा शिंदे व त्यांच्या लोकांना इशारा आहे", असं सामनातून म्हटलं आहे.
(नक्की वाचा- Nitesh Rane: आजारपणाचे सोंग घेऊन विदेशवारी करणे पडले महागात, कामचुकार अधिकारी निलंबित)
लोकांना मूर्ख बनवायचा भाजपचा धंदा
"छगन भुजबळ यांच्या काही घोटाळ्यासंदर्भात स्वतः फडणवीस यांनीच आवाज उठवला होता. अजित पवार यांनादेखील तुरुंगात भुजबळांच्या शेजारच्या कोठडीत चक्की पिसायला पाठवू अशी फडणवीस यांची ललकारी होती. भुजबळ व अजित पवार यांची जागा तुरुंगातच आहे व अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री ठाकरे बसतात यास काय म्हणावे? त्यामुळे ठाकऱ्यांचे सरकार आम्ही खेचणार व भुजबळ, अजित पवारांना चक्की पिसायला पाठवणार, असे फडणवीस रोज बोलत होते. भुजबळ निर्दोष मुक्त झालेले नाहीत, फक्त जामिनावर सुटले आहेत याचाही उल्लेख फडणवीस जाणीवपूर्वक करत असत. मात्र आज चित्र असे आहे की, भुजबळ आणि अजित पवार हे दोघे नेते त्यांच्या ऐतिहासिक मांड्य़ांसह फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत व भाजपचे लोक त्यांच्या मांड्यांना ‘देवेंद्ररत्न' तेल चोळून भ्रष्टाचाराचा पाया मजबूत करीत आहेत. एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्याला तुरुंगात पाठवायचे, त्याच्या मांडीला मांडी लावून कधीच बसणार नाही, असे बोंबलायचे. नंतर मात्र सत्तेसाठी त्यांनाच पक्षात घेऊन लोकांना मूर्ख बनवायचे हा भारतीय जनता पक्षाचा धंदा आहे", असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.