
आजारपणाच्या नावाखाली वैद्यकीय रजा घेऊन विदेशात मौजमजा करणे नाशिकच्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त प्र.दा. जगताप यांना चांगलेच महागात पडले आहे. वरिष्ठांची दिशाभूल करून देशात युद्धजन्य परिस्थिती असताना आजारपणाच्या नावाखाली विदेशात सैर करायला गेलेल्या सहाय्यक आयुक्त जगताप यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यापूर्वीच कर्तव्यात कसूर केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी कारवाई केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देशातील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आल्या होत्या. शासकीय कामाकरता नाशिकचे मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त जगताप हे इगतपुरी न्यायालयात आले होते. त्यावेळी त्यांची शुगर कमी झाल्यामुळे अशक्तपणा येऊन चक्कर आल्याचे व शुद्धीवर आल्यानंतर दवाखान्यात जावे लागल्याने सांगितले. त्यासाठी त्यांनी नाशिक येथील प्रादेशिक कार्यालयाकडे अर्धा दिवस किरकोळ रजेचा अर्ज सादर केला होता. शिवाय तब्येत बरी नसल्याचे त्यांनी भासवले होते.
मात्र प्रत्यक्षात ते विदेशवारी वर गेल्याचे निष्पन्न झाले. या घटनेत जगताप यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, कर्तव्यात कसूर करणे, कार्यकर्तव्यावर गैरहजर असणे आणि वरिष्ठांची दिशाभूल केली असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व गंभीर बाबी लक्षात घेऊन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी कारवाईचा बडगा उचलत मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त जगताप यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार त्यांच्यावर आज निलंबन कारवाई करण्यात आली. निलंबन आदेशात जगताप हे निलंबित असेपर्यंत मत्स्य व्यवसाय नागपूर प्रादेशिक उपायुक्त यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाहीत. तसेच त्यांचे मुख्यालय चंद्रपूर हे राहील असेही स्पष्टपणे बजावण्यात आले आहे. त्यांच्यावर झालेल्या या कारवाई मुळे मत्स्य विभागात खळबळ उडाली आहे. कामात कसूर केल्यास आपल्यावर ही कारवाई होवू शकते असा मसेज या माध्यमातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये गेला आहे. या कारवाईची चर्चा सध्या विभागात रंगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world