Narayan Rane vs Sanjay Raut: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात माझगाव न्यायालयात महत्त्वाची साक्ष नोंदवली आहे. नारायण राणे यांनी माझ्या राज्यसभा खासदारकीबाबत खोटे आरोप करून माझी आणि निवडणूक प्रक्रियेची बदनामी केल्याचा दावा राऊत यांनी यावेळी केला.
एकेकाळी मीच शिवसेना चालवत होतो, हे दाखवण्यासाठी आणि माझ्याच परिसरात मला कमी लेखून स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी राणे यांनी हे जाणीवपूर्वक विधान केल्याचे राऊत यांनी न्यायालयात सांगितले.
काय म्हणाले राऊत?
संजय राऊत यांनी आपल्या साक्षीत म्हंटले आहे की, नारायण राणे यांनी माझ्या उमेदवारीवर आणि निवडून येण्यावर जे आरोप केले, ते अत्यंत गंभीर आहेत. माझ्या राज्यसभा उमेदवारीवर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे केवळ माझी वैयक्तिक बदनामी नसून, निवडणूक आयोग भ्रष्ट असल्याचे भासवण्यासारखे आहे.
राणे यांनी ज्या पद्धतीने मी पैसे खर्च करून राऊत यांना खासदार केले असे वक्तव्य केले, ते थेट भारतीय राज्यघटनेला दिलेले आव्हान आहे. राज्यसभा निवडणूक यंत्रणा ही पारदर्शक असते, परंतु ती भ्रष्ट आहे असे चित्र राणे यांनी आपल्या भाषणातून निर्माण केल्याचा आरोप राऊत यांनी केला.
( नक्की वाचा : Kalyan News: 15 मिनिटांत ऐरोली आणि थेट तळोजा मेट्रो! कल्याणकरांच्या प्रवासाचा 'कायापालट' करणारा 'मेगा प्लॅन' )
काय आहे प्रकरण?
भांडुप येथील अटल बिहारी वाजपेयी मैदानात आयोजित कोकण फेस्टिव्हलच्या कार्यक्रमात नारायण राणे यांनी एक भाषण केले होते. या भाषणात राणे म्हणाले होते की, मी संजय राऊत यांना खासदार केले. बाळासाहेब ठाकरेंनी मला बोलावून राऊत यांना राज्यसभेवर पाठवायचे असल्याचे सांगितले होते, त्यानुसार मी कामाला लागलो.
राणे यांनी असाही दावा केला होता की, संजय राऊत यांचे नाव मतदार यादीत नव्हते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता, मात्र मी मध्यस्थी करून त्यांना निवडून आणले. इतकेच नाही तर त्यांना खासदार करण्यासाठी मी पैसे खर्च केले, असे धक्कादायक विधानही राणे यांनी केले होते.
( नक्की वाचा : Bhigwan Kidnapping Case: मलाही मुलगी आहे आणि घरात..; आरोपांच्या फैरीनंतर भाजपा आमदाराचं भावनिक उत्तर )
मतदार यादीतील नावाचा पुरावा सादर
नारायण राणे यांचे हे सर्व आरोप संजय राऊत यांनी खोडून काढले आहेत. राऊत यांनी न्यायालयात सांगितले की, माझे नाव मतदार यादीत भाग क्रमांक 148 आणि मतदार नोंदणी क्रमांक 1194 वर नोंदवलेले आहे.
मी यापूर्वीच्या सर्व निवडणुकांमध्ये मतदान केले आहे. उमेदवारी अर्ज भरताना सर्व रकाने व्यवस्थित भरले होते, तरीही माझे नाव मतदार यादीत नव्हते असा खोटा आरोप राणे यांनी केला. याबाबतचे मूळ प्रमाणपत्र आणि छायांकित प्रत राऊत यांनी न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली आहे.
राणे यांचे हे भाषण माझ्या घरापासून केवळ 15 मिनिटांच्या अंतरावर झाले होते. त्यामुळे माझ्या परिसरातील अनेक लोकांनी मला फोन करून याबद्दल विचारणा केली, जे माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आणि मानहानीकारक होते, असे राऊत म्हणाले. या भाषणाचे वृत्त सर्व मीडिया आणि टीव्ही चॅनेलवर प्रसिद्ध झाले होते.
या सर्व बातम्यांच्या प्रति, न्यूज चॅनेलचे व्हिडिओ आणि पेनड्राइव्ह राऊत यांनी न्यायालयात सादर केला आहे. या प्रकरणी राणे यांना 2 फेब्रुवारी रोजी कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी त्याला कोणतेही उत्तर दिले नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world