महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महाविकास आघाडी (MVA) अंतर्गत मोठे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने ठाकरे गटात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. या भेटीवर शिवसेनेचे (UBT) खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. "गद्दारांना प्रतिष्ठा का देताय? ही गोष्ट आमच्या मनाला लागली आहे," असे म्हणत राऊत यांनी शरद पवारांच्या कृतीवर जाहीर आक्षेप घेतला आहे.
'शरद पवारांच्या कालच्या कृतीमुळे शिवसेना अस्वस्थ'
संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीतील या अंतर्गत नाराजीला तोंड फोडले. संजय राऊत यांनी म्हटलं की, "शरद पवार हे एनडीए सोबत जाणार नाहीत, त्यांच्या विचारधारेबद्दल आमच्या मनात तीळमात्र शंका नाही. मात्र, काल त्यांनी एकनाथ शिंदेंची घेतलेली भेट आणि त्यांच्या कृतीविषयी शिवसेना नक्कीच अस्वस्थ झाली आहे. या गोष्टीची सध्या अजिबात गरज नव्हती."
(नक्की वाचा- Marathwada News: जमिनीतून मोठा गूढ आवाज अन् हादरे; नागरिकांची मध्यरात्री पळापळ, 3 जिल्ह्यांमध्ये खळबळ)
बेईमानीबद्दल बोलण्याचा अधिकार राहणार नाही
शरद पवारांना थेट सवाल करताना राऊत म्हणाले, "तुम्ही महाराष्ट्राला नक्की काय दाखवत आहात? जर तुम्ही अशा प्रकारे गद्दारांना प्रतिष्ठा देणार असाल, तर उद्या तुमच्या पक्षात जी बेईमानी झाली, त्याबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला उरणार नाही."
"एकनाथ शिंदे म्हणजे यशवंतराव चव्हाण आहेत का?"
अजित पवार यांच्या बंडखोरीचा दाखला देत संजय राऊत यांनी पवारांना त्यांच्याच भूमिकेची आठवण करून दिली. "अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जी बेईमानी झाली, ती गद्दारीच होती. मग त्यांच्याविरोधात कोर्टात जाणे, राजकीय भूमिका घेणे कशासाठी? आम्ही इथे आमच्या पक्षातील गद्दारांविरोधात प्रामाणिकपणे लढत आहोत, मग तुम्ही त्यांना प्रतिष्ठा कशाला देताय? एकनाथ शिंदे हे काय यशवंतराव चव्हाण आहेत का?" असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
(नक्की वाचा- FDA Action: मुंबईतील प्रसिद्ध 'रुस्तम आईस्क्रीम'ला FDAने ठोकले टाळे! तपासणीदरम्यान दुकानात काय आढळलं?)
आपल्या वक्तव्यात शरद पवारांसोबत असलेल्या वैयक्तिक संबंधांचा उल्लेख करत राऊत म्हणाले, "माझे शरद पवारांशी असलेले संबंध अत्यंत आदराचे आणि प्रेमाचे आहेत. मात्र, मी माझ्या पक्षाच्या भूमिकेवर ठाम आहे. गद्दारी ही गद्दारीच असते आणि गद्दारांना कधीही माफी नाही, तरच या महाराष्ट्राला लागलेली राजकीय कीड नष्ट होईल. जर राज्यातील मोठे नेतेच गद्दारांना प्रतिष्ठा देत राहिले, तर या महाराष्ट्राची बदनामी होणारच."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world