
विशाल पुजारी, कोल्हापूर
Kolhapur News : कधी दूधवाला बनून तर कधी भंगारवाला बनून एका पठ्ठ्याने तब्बल 100 कोटी रुपयांची फसवणूक केली. खरेदी विक्रीची बिले दाखवून जीएसटीचा परतावा घेतल्याचे हे प्रकरण आहे. कर चोरीच्या या प्रकरणामुळे जीएसटी विभाग खडबडून जागा झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ही घटना उघडकीस आली आहे. केंद्रीय जीएसटी गुप्तचर विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणातील संशयित आरोपीला अटक केली आहे.
केंद्रीय जीएसटी गुप्तचर विभाग अधिकारी अभिजीत भिसे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीचे नाव साजिद अहमद शेख असं आहे. साजिद शेख हा मूळचा सोलापूर येथील रहिवासी असून वकील आहे. याने जवळपास 30 कंपन्या सुरु केलेल्या होत्या. या सगळ्या कंपन्या बनावट कंपन्या होत्या. या कंपन्यांच्या माध्यमातून शेख हा व्यक्ती कर चोरी करत होता. आतापर्यंत त्याने जवळपास 100 कोटी इतकी रक्कम शासनाची फसवणूक करून घेतलेली आहे.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
100 कोटींचा घोटाळा कसा केला?
सोलापुरातील अॅड. साजिद शेख याने 30 बनावट कंपन्या सुरू केल्या होत्या. त्याद्वारे तो सिमेंट आणि सळी खरेदी- विक्रीचे कागदोपत्री व्यवहार दाखवत होता. त्याची बिले जीएसटी विभागाकडे सादर करून त्यावरील रिटर्न्स कराचा लाभ घेत होता. प्रत्यक्षात वस्तूंची विक्री न करताच बनावट बिलांच्या आधारे कर चोरी केल्याचा संशय येताच केंद्रीय जीएसटी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या पथकाने दोन महिन्यांपूर्वी शेख याच्या सोलापूरातील कार्यालयावर छापा टाकला होता. एकाच दिवशी त्याच्या 12 कंपन्यांची चौकशी केली. त्यात जवळपास 50 कोटीपर्यंत कर चोरी केल्याचे स्पष्ट झाले. इतर 18 कंपन्यांसह कर चोरीची रक्कम शंभर कोटींच्या वर पोहोचेल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
( Vaishnavi Hagavane: 'सासऱ्याने कपडे फाडले, दिराने खाली पाडले' वैष्णवीच्या मोठ्या जावेने सर्वच सांगितलं) )
भंगार विक्रेता, दूध विक्रेता, ट्रकचालक यांच्या नावे कंपन्या
शेख याने भंगार विक्रेता, दूध विक्रेता, ट्रकचालक अशा व्यक्तींच्या नावे कंपन्या सुरू केल्याचे दाखविले आहे. त्यांच्या नावावर काढलेल्या बँक खात्याचा वापर शेख स्वतः करत होता. त्यातील 12 जणांचे जबाब गुप्तचर अधिकाऱ्यांनी नोंदवले आहेत. उर्वरित 18 जणांचे जबाब लवकरच नोंदवले जाणार आहेत. गुप्तवर अंधिकाऱ्यांनी शेख याच्या सोलापुरातील कार्यालयात छापा टाकून कॉम्प्युटर, मोबाईल आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. यात बोगस कंपन्यांच्या खरेदी-विक्री व्यवहाराची कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत. यावरून या गुन्ह्याची व्याप्ती स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
(Badlapur News: बदलापूरकरांना मोठा दिलासा! पुढील 30 वर्षांचा पाणीप्रश्न मिटणार)
शासनाची दिशाभूल करून कर चोरी केल्याबद्दल अधिकाऱ्यांनी शेख याला नोटीस पाठवून कोल्हापुरात बोलावले होते. त्यानंतर कोल्हापुरातील केंद्रीय जीएसटी कार्यालयात त्याला गुरुवारी (22 मे ) अटक केली. जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. अधिकाऱ्यांनी त्याला कळंबा मध्यवर्ती कारागृहात पाठविले. वरिष्ठ गुप्तचर अधिकारी अभिजित भिसे, गुप्तचर अधिकारी वरून सिंग, अतुल कुमार जैस्वाल यांनी ही कारवाई केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world