Sharad Pawar Health News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती सोमवारी (9 फेब्रुवारी 2026) अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. शरद पवारांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (10 फेब्रुवारी 2026) फोनद्वारे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान मोदींसह केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही शरद पवार यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
शरद पवार यांच्यावर पुण्यात औषधोपचार
छातीत संसर्ग (Chest Congestion) झाल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शरद पवार यांना उपचारांसाठी तातडीने बारामतीतून पुण्यामध्ये हलवण्यात आले. यावेळेस त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar News), जय पवार आणि पार्थ पवार यांनीही सोमवारी रात्री उशीरा शरद पवारांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. गेल्या काही दिवसांच्या धावपळीमुळे त्यांना थकवा जाणवत होता, पवारांच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळताच केंद्रातील बड्या नेत्यांनी फोनद्वारे त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
(नक्की वाचा: Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या आजाराचं खरं कारण समोर, सूत्रांची मोठी माहिती;सुनेत्रा पवारही भेटीला)
रुबी हॉल क्लिनिकडून महत्त्वाची माहिती
दरम्यान शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत पुण्यातील रुबी हॉल क्लिनिककडून महत्त्वाची माहिती समोर आलीय. शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर सायमन ग्रँट यांनी दिलीय. तसेच त्यांना होत असलेला त्रास आता काही प्रमाणात कमी झाल्याचीही माहिती त्यांनी दिलीय.
सुप्रिया सुळे यांची सोशल मीडियावर पोस्टखासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत सांगितले की, "बाबांना (Sharad Pawar) छातीत कफ झाला आहे. डॉक्टरांनी पाच दिवसांचा अँटिबायोटिक्सचा उपचार सुचवला आहे. सुदैवाने इतर सर्व महत्त्वाचे पॅरामीटर्स सामान्य असून प्रकृती स्थिर आहे. योग्य उपचार सुरू असल्याने काळजीचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबाबत सर्वांचे आभार. सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार".