
Mla Sanjay Gaikwad : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना आमदार निवासातील कॅन्टिन चालकाला मारहाण केल्याचं प्रकरण अधिवेशनातही गाजलं. आमदार संजय गायकवाड यांच्या या कृतीमुळे त्यांच्यावर चहूबाजूने टीका होत आहे. विरोधकांनी संजय गायकवाड यांच्यावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मारहाणीच्या घटनेवरून संजय गायकवाड यांच्या कानपिचक्या दिल्या.
संजय गायकवाड यांच्या मारहाणीच्या मुद्यावरून ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी म्हटलं की, एक आमदार बनियन आणि टॉवेलवर येतो आणि बॉक्सिंग करत असल्यासारखं एका साध्या माणसाला मारतो. अरे हिंमत असेल तर त्या खात्याच्या मंत्र्याला मारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा क्लीन आहे आणि तुम्ही अशा आमदाराचा पाठिंबा घेणार का? आपल्या विधिमंडळ कक्षात सदर विभाग येतो त्यामुळे तुम्ही त्याला निलंबित करा, अशी मागणी अनिल परब यांनी केली.
(नक्की वाचा- Shinde Sena MLA Violence : आमदार निवासातील निकृष्ट जेवणावरुन संजय गायकवाडांचा राडा; कँटिन चालकाला बेदम मारहाण)
यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, "मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. असं वर्तन योग्य नाही. तिथून माहिती आली की भाजीला वास येत होता. मात्र टॉवेलवर मारणं किंवा दुसऱ्या कपड्यांवर मारणं चुकीचंच आहे. आमदार म्हणून आपली प्रतिष्ठा कमी होते. याची तक्रार करता आली असती. सभागृहातील अध्यक्षांनी योग्य तो निर्णय घ्यावा. जी काही कारवाई करता येईल तो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा."
(नक्की वाचा- Who Is Sanjay Gaikwad : वरणासाठी कँटीनच्या मॅनेजरला मारणारे आमदार संजय गायकवाड कोण आहेत?)
काय आहे प्रकरण?
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासात निकृष्ट जेवण मिळत असल्याचा आरोप करत कॅन्टिन चालकाला मारहाण केली. संजय गायकवाड यांनी रूम नंबर 107 मधून जेवणाची ऑर्डर दिली होती. मात्र त्यांना आलेली डाळ निकृष्ट दर्जाची होती. डाळीला उग्र वास येत होता. ती डाळ खाल्ल्यावर पोटात मळमळू लागलं, असं संजय गायकवाड यांनी सांगितलं. यानंतर संतापलेल्या संजय गायकवाड यांनी कँटिनमध्ये राडा घातल कन्टिन चालकाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संजय गायकवाड यांच्यावर टीका होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world