सुनिल दवंगे, प्रतिनिधी
Shirdi News Today : देशात सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवू लागला असून त्याचे परिणाम सर्वसामान्यांसोबतच मोठ्या धार्मिक स्थळांवरही दिसू लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानचं प्रसादालयात दररोज हजारो भाविकांसाठी अन्न तयार केले जाते. मात्र गॅस टंचाईची परिस्थिती गंभीर झाल्यास प्रसादालयातील काही कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिर्डीतील साईबाबा संस्थानमार्फत मोठ्या प्रमाणावर प्रसादालय चालविले जाते. येथे दररोज साधारण 35 ते 40 हजार भाविकांसाठी भोजन तयार केले जाते. याशिवाय भाविकांना दररोज सुमारे सात हजार नाष्ट्याची पाकिटे वितरित केली जातात. तसेच भाविकांना मोफत देण्यात येणारी बुंदी पाकिटे आणि प्रसाद म्हणून विक्रीसाठी तयार करण्यात येणारे लाडू मोठ्या प्रमाणावर बनविले जातात. या सर्व प्रक्रियेसाठी एलपीजी गॅसचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
साई संस्थानच्या प्रसादालयात दररोज जवळपास दीड टन एलपीजी गॅसचा वापर होतो.विशेष म्हणजे वापरल्या जाणाऱ्या गॅसपैकी जवळपास अर्धा गॅस हा केवळ लाडू आणि बुंदी तयार करण्यासाठी खर्च होतो.त्यामुळे गॅस पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास सर्वप्रथम प्रसादासाठी तयार होणाऱ्या लाडू आणि बुंदीच्या निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील 'या' परिसरात लगीनघाई संकटात! तब्बल 10 हजार लग्न लांबणीवर? कारण वाचून सर्वच झाले थक्क
दररोज जवळपास 200 किलो एलपीजी गॅसची बचत
दरम्यान, साईबाबा संस्थानने 2009 साली प्रसादालयातील अन्न शिजवण्यासाठी सौर उर्जा यंत्रणा बसविली आहे. या सौर उर्जा यंत्रणेच्या माध्यमातून दररोज जवळपास 200 किलो एलपीजी गॅसची बचत होते. या प्रणालीद्वारे दररोज जवळपास पाच टन भात आणि डाळ शिजवली जाते. यामुळे एलपीजी गॅसची मोठ्या प्रमाणात बचत होते. मात्र इतर अन्न तयार करण्यासाठी एलपीजी शिवाय पर्याय नसल्यानं अडचण निर्माण होवू शकते.
संस्थानला दररोज मोठ्या प्रमाणावर गॅस लागतो. त्यामुळे गॅस साठवण्यासाठी संस्थानने 10 टन क्षमतेचे दोन स्टोअरेज टँक उभारले आहेत. या टँकमध्ये एकूण 20 हजार किलो गॅस साठवता येतो आणि हा साठा साधारणपणे 15 दिवस पुरतो. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर संस्थानकडे जवळपास 12 टन गॅस साठा उपलब्ध होता. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन संस्थानने तातडीने 15 टन क्षमतेचा आणखी एक गॅस टँकर मागवून साठा वाढवला आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध गॅससाठा पुढील सुमारे 15 दिवस पुरेल,असं साई संस्थानकडून सांगण्यात येत आहे.
नक्की वाचा >> Dombivali News : डोंबिवलीत खळबळ! सुरक्षा रक्षकाची हत्या, महिलेसोबतचा वाद विकोपाला गेला, पतीनं केलं असं काही..
सध्या शिर्डीत भाविकांची गर्दी तुलनेने कमी असली तरी पुढील पंधरा दिवसांत श्रीरामनवमी उत्सव येत असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित आहे.त्यामुळे प्रसादालय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी संस्थान प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. गॅस पुरवठादार कंपन्यांनी पुढील काळातही एलपीजी टँकरचा पुरवठा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.मात्र,परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास श्रीरामनवमीच्या काळात साई संस्थानला प्रसादासाठी तयार होणारे लाडू आणि बुंदी निर्मिती तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो,अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे गॅस पुरवठा सुरळीत राहणे साई प्रसादालयाच्या कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world