जाहिरात

Election News: छत्रपती संभाजीनगरमध्ये युती फिस्कटणार? शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपला 24 तासांची 'डेडलाईन'

एकीकडे युतीची चर्चा सुरू असतानाच, शिवसेनेने आपली उमेदवारांची यादी देखील तयार ठेवली आहे. प्रत्येक प्रभागातील ताकदीचा आढावा घेऊन इच्छुक उमेदवारांची छाननी पूर्ण झाली असल्याचे सूत्रांकडून समजते.

Election News: छत्रपती संभाजीनगरमध्ये युती फिस्कटणार? शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपला 24 तासांची 'डेडलाईन'

छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील युती धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांत गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडून अवास्तव जागांची मागणी केली जात असल्याचा दावा शिवसेनेने केला असून, आता हा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. शिवसेनेने भाजपला युतीबाबत केवळ एक दिवसाची 'डेडलाईन' दिली असून, त्यानंतर स्वतंत्रपणे लढण्याचा इशारा दिला आहे.

​नेत्यांच्या गुप्त बैठका आणि स्वबळाचा इशारा

​युतीची चर्चा रखडल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी आता 'प्लॅन बी'वर काम सुरू केले आहे. खासदार संदिपान भुमरे, संपर्कप्रमुख विलास पारकर आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यात आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपाच्या कोंडीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. "भाजप नेत्यांकडून युतीसाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही," असे सांगत संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. उद्यापर्यंत जर भाजपने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर शिवसेना आपले उमेदवार जाहीर करण्यास मोकळी असेल, असा थेट इशारा यावेळी देण्यात आला.

(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)

​शिवसेनेची उमेदवारांची यादी तयार

​एकीकडे युतीची चर्चा सुरू असतानाच, शिवसेनेने आपली उमेदवारांची यादी देखील तयार ठेवली आहे. प्रत्येक प्रभागातील ताकदीचा आढावा घेऊन इच्छुक उमेदवारांची छाननी पूर्ण झाली असल्याचे सूत्रांकडून समजते. "आम्ही युतीसाठी प्रयत्नशील होतो, पण सन्मानजनक जागा मिळत नसतील तर स्वबळावर लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे," असे मत जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केले. भाजपच्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण असून, आता सर्वांच्या नजरा उद्याच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.

(नक्की वाचा-  स्पर्धा जिंकली मात्र जीव गमावला! पंजाबच्या प्रसिद्ध पॉवरलिफ्टरचा आणि इन्फ्लुएन्सरचा स्पर्धेतच मृत्यू)

​पाच वर्षांनंतर राजकीय समीकरणे बदलणार?

​गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकीय राजवट असलेल्या या महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी दोन्ही पक्षांना एकमेकांची साथ आवश्यक असल्याचे बोलले जात होते. मात्र, जागांच्या आकड्यांवरून अडलेले हे घोडे आता युती तोडण्यापर्यंत पोहोचले आहे. जर ही युती तुटली, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बहुकोणीय लढत पाहायला मिळेल, ज्याचा फटका दोन्ही पक्षांना बसू शकतो. आता भाजप या 'डेडलाईन'वर काय भूमिका घेते, यावरच शहराचे आगामी राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com