निनाद करमरकर, बदलापूर
अंबरनाथमधील काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप करत त्यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे. मात्र पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी एप्रिल महिन्यातच शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला होता. त्यात 4 महिन्यांनी झालेली ही कारवाई संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे.
प्रदीप पाटील हे 1995 पासून अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक असून माजी विरोधी पक्षनेते सुद्धा राहिले आहेत. अंबरनाथ शहरात प्रदीप पाटील यांनी मागील अनेक वर्षे काँग्रेसची एकहाती धुरा सांभाळली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी वैयक्तिक कारणास्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला होता.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना अंबरनाथ शहरातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते. मात्र यानंतर तब्बल 4 महिन्यांनी काँग्रेसने प्रदीप पाटील यांचं निलंबन केल्याचं पत्र जारी केलं आहे. काँग्रेसचे प्रशासन आणि संघटन प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी हे पत्र जारी केलं आहे.
मात्र शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ४ महिन्यांनी गावंडे यांनी हे पत्र का जारी केलं असावं? यावरून प्रदीप पाटील यांच्या समर्थकांनी संशय व्यक्त केला आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच योग्य निर्णय घेतील, असाही दावा प्रदीप पाटील समर्थकांनी केला आहे.