आगामी विधानसभा निवडणूक आणि पक्षाला देणगी मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत निराधार आरोप केले आहेत, अशी टीका शिवसेना उपनेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केली.
राहुल शेवाळे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी अचानक धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत पत्रकार परिषद घेऊन निराधार टीका का केली? यामागे नेमकी कोणती कारणे आहेत? याबाबत जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह आहेत. धारावीकरांना पुनर्विकासात 350 स्क्वेअर फुटाचे घर देण्याचा निर्णय हा उद्धव ठाकरे यांना विश्वासात घेऊन करण्यात आला होता. सीआरझेडची नियमावली, हवाई वाहतुकीबाबतचे नियम या सगळ्या बाबींचा विचार करून धारावीत 350 स्क्वेअर फुटापेक्षा मोठे घर देता येणार नाही, ही वस्तुस्थिती त्यांनाही ठाऊक आहे.
मात्र तरीही केवळ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी 500 स्क्वेअर फुटांच्या घराचा अवास्तव मुद्दा विरोधकांकडून समोर आणला गेला. तसेच धारावीतील निसर्ग उद्यान, धारावी कोळीवाडा, मलनिःसारण प्रकल्प यांसारख्या बाबींमुळे धारावीत सध्या अस्तित्वात असलेली संपूर्ण जागा पुनर्विकासासाठी वापरता येणार नाही, याची देखील कल्पना सर्वांना आहे. मात्र तरीही अदाणी यांचा प्रतिस्पर्धी असलेल्या मित्राच्या हितासाठी हे आरोप केले जात आहेत, असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं.
विरोधकांना धारावीकरांच्या हिताची काळजी नाही
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या काळात वेग आला. मात्र केवळ हा प्रकल्प रोखण्यासाठी विरोधकांकडून अवास्तव मागण्या आणि आरोप केले जात आहे. विरोधकांना धारावीकरांच्या हिताची कोणतीही काळजी नसून केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे, असा आरोप राहुल शेवाळे यांनी केला.
विरोधकांकडून गैरसमज पसरवला जातोय
वास्तविक, धारावी पुनर्विकास प्रकल्प हा अदाणी यांचा प्रकल्प नसून राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. धारावीतील प्रत्येक पात्र व्यक्तीला धारावीतच घर आणि दुकान मिळेल. तसेच अपात्र लोकांनाही घर दिले जाईल याची शाश्वती याआधी देखील शासनाने देऊ केली आहे. तरीही विरोधकांकडून वारंवार गैरसमज पसरवण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world