छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना रमेश बोरनारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. विधानसभेच्या 2019 मधील निवडणुकीत पैसे देऊन उमेदवारी दिली जाणार होती, असा गंभीर आरोप बोरनारे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. तीन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी वैजापूरमधील सभेतून बोरनारेंवर टीका केली. त्यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देतांना बोरनारे यांनी ठाकरेंवर हे आरोप केले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरेंवर टीका करतांना बोरनारे म्हणाले की, माजी मुख्यमत्र्यांचा समतोल बिघडला आहे म्हणून ते एका आमदाराबद्दल असे बोलले. हे त्यांना शोभत नाही. आम्हाला वाटलं ठाकरे एखाद्या उमेदवाराची घोषणा करतील, मात्र त्यांनी आपण काय केले हेच सांगितले. मी ठरवलं होते की, ठाकरे आणि माजी आमदार वाणी या दोन घरांबद्दल बोलणार नाही. पण मला सहज उमेदवारी मिळाली नव्हती. जेव्हा तिकीट मिळणार होते, तेव्हा शेवटच्या वेळेस उद्धव ठाकरे पैसे देणाऱ्याला तिकीट देणार होते. मात्र मी त्यांना भेटून 25 वर्ष पक्षासाठी काय केले हे सांगितले. तसेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं नाही तर शिवसैनिक आत्महत्या करतील असे सांगितले. तेव्हा उमेदवारी मिळाली, असे बोरनारे म्हणाले.
(नक्की वाचा- "राहुल गांधींच्या जीभेला चटके दिले पाहिजेत", भाजप खासदाराची बेताल वक्तव्य)
बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना उलट टांगलं असतं
तीन दिवसांपूर्वीच म्हणजे 15 सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे यांची वैजापूरमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी 'वाणी साहेब असते तर वैजापूरच्या गद्दाराला उलटे लटकवून चोपले असते', असे म्हणत बोरनारे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना बोरनारे म्हणाले की, 'उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना उलट टांगलं असतं. माजी आमदार वाणी यांना उद्धव ठाकरेंनी अनेकदा त्रास दिला. उद्धव ठाकरे मला नेहमी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात असे स्वतः वाणी साहेब मला म्हणाले होते, असं देखील बोरनारे म्हणाले.
(नक्की वाचा- DJ चा कहर? आवाजामुळे एकाचा मृत्यू झाल्याचा दावा, तीन जण जखमी)
कोण आहेत रमेश बोरनारे?
रमेश बोरनारे वैजापूर विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये निवडून आले आहेत. शिवसेना पक्षाकडून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. शिवसेनेचे माजी आमदार आर. एम. वाणी 2019 मध्ये आपण निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत पक्षात चर्चा झाली. यावेळी रमेश बोरनारे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष होते. तर माजी आमदार वाणी यांनी देखील बोरनारे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यामुळे बोरनारे यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर बोरनारे हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांचा पराभव करून पहिल्यांदा आमदार बनले. पुढे शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर बोरनारे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांमध्ये देखील बोरनारे यांचा समावेश होता.