शुभम बायस्कार, अमरावती
शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची भाषा केल्यानंतर काँग्रेसने महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. 'राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस जाहीर करणाऱ्या आमदारानंतर आता भाजप खासदाराने राहुल गांधी यांची "जीभ छाटू नये तर 'जिभेला चटके द्यायला हवे" असं प्रक्षोभक विधान केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महायुतीतील नेत्यांचा वादग्रस्त विधान करण्याचा क्रम सुरू असतानाच पुन्हा आणखी एका एका बड्या नेत्याकडून प्रक्षोभक विधान करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटू नये तर जिभेला चटके द्यायला हवं असं वादग्रस्त विधान भाजपचे नेते, अमरावतीमधील राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केलं आहे.
( नक्की वाचा : '....तर फोटो आणि व्हिडिओ जाहीर करा,' खडसेंच्या दाव्याला महाजनांनी दिलं उत्तर )
बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टोकाची टीका केली होती. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस मी माझ्या वतीने देईल, असे वादग्रस्त विधान करत त्यांनी चांगलीच खळबळ उडून दिली होती. गायकवाड यांच्या या विधानाचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून चांगलाच समाचार घेण्यात आला.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांपासून तर काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी संजय गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गायकवाड यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- चित्रपटाच्या पोस्टरवर झळकले राज ठाकरे, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी प्रदर्शित होणार चित्रपट)
'महाराव, श्याम मानवांवरही हल्लाबोल'
संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाही. परंतु राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे. विदेशात जाऊन वात्रटासारखं कोणी बोलत असेल तर त्यांची 'जीभ छाटू नये जिभेला चटके मात्र दिले पाहिजे. अशा लोकांना जिभेला चटके देणे आवश्यक आहे. राहुल गांधी, ज्ञानेश महाराव असो अथवा श्याम मानव असोत', असे म्हणत भाजप खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी ज्ञानेश महाराव श्याम मानव यांच्यावर देखील टीका केली आहे. भारतामधील बहुसंख्यांकांच्या भावना जे दुखावतात त्या लोकांना किमान जाणीव तरी करून द्यायला हवी. म्हणून 'जीभ छाटू नये तर जिभेला चटके' मात्र निश्चितच दिले पाहिजे, असा पुनरुच्चार देखील अनिल बोंडे यांनी केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world