
अमजद खान, प्रतिनिधी
राज्यातील सर्वच शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. या कुत्र्यांमुळे अनेक परिसरात फिरताना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असतं. या प्रकरणात वारंवार मागणी करुनही प्रशासनाकडून पुरेसे उपाय होत नाहीत. त्यामुळे हे कुत्रे नागरिकांना चावल्याच्या घटनाही सतत घडत असतात. कुत्रे चावल्यानंतर तातडीनं उपचार घेणं आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष हे जीवावर बेतू शकतं. कल्याणमधील एका तरुणाला हे दुर्लक्ष महाग पडलं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याचा मृत्यू कुत्र्यासह मांजर चावल्यानंही झाला आहे.
काय आहे प्रकरण?
शुभम चौधरी असं या तरुणाचं नाव होतं. शुभम त्याच्या कुटुंबीयांसह कल्याण पश्चिमेतील गोल्ड पार्क परिसरात राहात होता. शुभमचे वडिल घाटकोपर येथील एका खाजगी मेडिकल दुकानात कामाला आहेत. शुभमचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तो नोकरीच्या शोधात होता.
शुभम दोन महिन्यांपूर्वी रात्री फेरफटका मारण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी एका भटक्या कुत्र्याने शुभमला चावा घेतला. हा चावा किरकोळ असल्याचे समजून शुभमने उपचार केले नाहीत. त्यानंतर मागच्या आठवड्यात त्याला एका मांजरीने चावा घेतला. तो चावाही किरकोळ असल्याने त्याने उपचार केले नाहीत.
( नक्की वाचा : घरगुती हिंसाचारात विवाहित महिलांपेक्षा तिप्पट पुरुषांनी दिला जीव, NCRB ची धक्कादायक आकडेवारी )
10 डिसेंबर रोजी त्याची प्रकृती बिघडली. त्याच्या घरच्यांनी त्याला प्रथम कल्याणमधील दोन खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कळवा येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला गेला. कळवा रुग्णालयातून त्याला मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयात नेले. त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याचा उपचार घेत असताना 12 डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजता मृत्यू झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world