ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Mumbai News : मुंबईतून एक भयंकर प्रकार समोर आला आहे. फास्टफूड मालकासोबत झालेल्या वादातून एका ग्राहकाने सामोसा खाल्ल्यानंतर फास्टफूड मालकाचं बोट तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दिंडोशी परिसरातून हा प्रकार समोर आला आहे.
फास्टफूड मालक आणि ग्राहकामध्ये वाद..
दिंडोशी परिसरात रणजित सिंह हे फास्टफूडचा व्यवसाय करतात. त्यांचं तेथे एक दुकान आहे. २८ मार्चला सायंकाळी लक्ष्मीधीर मलिक नावाचा एक तरुण त्यांच्या फास्टफूडच्या हॉटेलमध्ये आला होता. त्याने सामोसा आणि कटलेटची ऑर्डर दिली. सर्व खाऊन झाल्यावर लक्ष्मीधीर आणि फास्टफूड मालकामध्ये वाद झाला. सामोसा आणि कटलेटचे इतके पैसे कसे झाले असा सवाल ग्राहकाने उपस्थित केला आणि फास्टफूड मालकाला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने ऑनलाइन पैसे भरले.
मात्र त्यानंतरही तो फास्टफूडच्या मालकाला शिवीगाळ करीत होता. यावर फास्टफूडच्या मालकाने त्याला जाण्यास सांगितलं. यानंतर रागाच्या भरात लक्ष्मीधीर त्याच्या अंगावर धावून गेला. आणि रागाच्या भरात त्याने फास्टफूड मालकाच्या बोटाचा चावा घेतला. हा चावा इतका भयंकर होता की, मालकाचं बोटच तुटलं. रक्तबंबाळ अवस्थेत मालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणात मालकाने दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world