संकेत कुलकर्णी, सोलापूर
विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. त्याआधी सर्वच राजकीय पक्षांना बैठकांचा धडाका लागला आहे. दरम्यान सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार दीपक साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
दिपक साळुंखे यांच्यावर सध्या राष्ट्रवादीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाचे देखील त्यांनी राजीनामे दिले आहेत. दीपक साळुंखे यांनी निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयाने महायुतीला देखील धक्का बसल आहे.
दिपक साळुंखे पाटील यांनी राजीनामा दिल्याने सांगोल्यातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार शहाजी पाटलांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण विधानसभेसाठी सांगोल्यातून दिपक साळुंखे हे इच्छुक आहेत. त्यामुळे दिपक साळुंखे यांच्या निर्णयाचा शहाजी पाटील यांना फटका बसू शकतो.
(नक्की वाचा - ठाकरे गटाला धक्का! राज्यपाल नियुक्त 7 आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा, स्थगितीस कोर्टाचा नकार)
सांगोल्यातील माजी आमदार दिपक साळुंखे पाटील हे सध्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून दिपक साळुंखे यांची ओळख होती. मात्र नंतरच्या काळात दिपक साळुंखे यांनी अजित पवार यांची साथ दिली. दिपक साळुंखे हे महायुतीतून निवडणूक लढवण्यास तयारी केली आहे. मात्र सांगोला येथील विद्यमान आमदार शहाजी पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. त्यामुळे ही जागा येत्या काळात शिवसेनेच्या वाट्याला जाईल, अशी शक्यता आहे. असे असताना निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी साळुंखे यांनी अजित पवार गटाचा राजीनामा दिला. आणि आता थेट आपण जनता हाच पक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे.
(नक्की वाचा- Big News : राज्यपालनियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांची नावं जाहीर, आजच होणार शपथविधी )
दिपक साळुंखे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा करत असताना शेकाप आणि आमदार शहाजी पाटील यांनी आपल्याला साथ आणि संधी द्यावी असे आवाहनही केले आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होत असतानाच आता दिपक साळुंखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत थेट महायुतीला आणि अजित पवार यांना धक्का दिला आहे. त्यामुळे येत्या काळात आमदार शहाजी बापू पाटील यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. यानिमित्ताने राज्यातील पहिली बंडखोरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून पुढे येताना दिसत आहे.
दिपक साळुंखे यांच्यापुढील राजकीय पर्याय
दिपक साळुंखे आता जनतेच्या जीवावर पुढे येत आहेत, असे जरी जाहीर केले असले तरी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाची ऑफर दीपक साळुंखे यांच्याकडे येत असल्याची माहिती आहे. मात्र येत्या काळात दिपक साळुंखे कुठली भूमिका घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की अपक्ष म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world