Panvrl News: शेडुंग येथील सेंट विल्फ्रेड महाविद्यालयात एका उपप्राचार्याने विद्यार्थिनीकडे लाचेची मागणी करत अयोग्य वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्यासाठी युवासेनेने नवी मुंबई पोलीस उपायुक्तांकडे धाव घेतली आहे.
6000 रुपयांची मागणी आणि गैरवर्तन
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित उपप्राचार्याने ATKT विषयांमध्ये उत्तीर्ण करून देण्यासाठी प्रति विषय 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेच्या मागणीसोबतच त्या विद्यार्थिनीला एकांतस्थळी नेण्याचा प्रयत्न करून तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थिनीने या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पुरावा म्हणून सादर केले असूनही, महाविद्यालय प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने संतापाची लाट उसळली आहे.
(नक्की वाचा- Chandrapur News: चंद्रपूर हादरलं! मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांसोबत भयंकर घडलं; रुग्णालय सील)
युवासेनेच्या मागण्या काय आहेत?
- प्रकरणाची तात्काळ, निष्पक्ष व सखोल चौकशी करावी.
- आरोपीवर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कठोर कलमे लावून कारवाई करावी.
- महाविद्यालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी.
- पीडित विद्यार्थिनीला तात्काळ पोलीस संरक्षण व न्याय द्यावा.
- नवी मुंबईतील सर्व महाविद्यालयांमध्ये “विशेष महिला पोलीस सहकार्य सेल” स्थापन करावा.
- भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे व नियमित तपासणी राबवावी.
(नक्की वाचा- Crime News: सोनं-चांदी, पैशांना हातही लावत नाही; घरातील फक्त एक वस्तू चोरतोय हा चोर; पोलीसही चक्रावले)
"दोषींना सोडणार नाही" - आमदार महेंद्रशेठ थोरवे
कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. "हा केवळ एका विद्यार्थिनीचा विषय नसून सर्व मुलींच्या सन्मानाचा प्रश्न आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे," असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, युवासेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते यांनी इशारा दिला की, जर तातडीने कारवाई झाली नाही, तर युवासेना तीव्र आंदोलन छेडेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world