Pune News : पुण्यातून नेहमीच नवनव्या अशा अनोख्या गोष्टी समोर येत असतात. पुण्यातील एक गावाची गेल्या अनेक महिन्यांपासून मोठी चर्चा होत आहे. या गावातील ते दृश्य पाहून अनेकजण अचंबित होतात. सर्वसाधारपणपणे घरंदेखील स्मशानभूमीपासून दूर असतात. रात्रीच्या वेळी स्मशानभूमीच्या जवळून जातानाही अनेकांना भीती वाटते. मात्र या गावात चक्क स्मशानभूमीत अभ्यासिका चालवली जाते. आडाचीवाडी गावातील लहानांपासून मोठी मुलं स्मशानभूमीत येऊन अभ्यास करतात.
स्मशानभूमीत भरते अभ्यासिका...
पुण्यातील पुरंदर तालुक्यातील साधारण १५०० लोकवस्तीच्या आडाचीवाडी गावात एक अनोखी अभ्यासिका भरवली जाते. दररोज सायंकाळी ६.४० वाजता एक घंटा वाजते. पुढल्या काही मिनिटात शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थी आपली दप्तरं, पुस्तकं घेऊन निघतात. ते कोणा शाळेत किंवा अभ्यासिकेत जात नाहीत तर ते स्मशानभूमीच्या दिशेने निघतात. एकेकाळी सायंकाळ झाली स्मशानभूमीच्या दिशेला कोणीही जात नव्हतं. 'तिथं भुतं असतात' अशी भीती मुलांच्या मनात घातली जात होती. पण आज या स्मशानभूमिचं चित्र पूर्णपणे बदललं आहे.
गावातील या स्मशानभूमीचे रूपांतर आता एका आधुनिक अभ्यास केंद्रात झाले आहे. अल्युमिनियमचे छप्पर, स्टेडियमसारखे ग्रॅनाइटचे ओटे आणि ट्यूबलाईट्स यामुळे ही जागा आता भीतीदायक वाटत नाही. येथे मुलांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी गावातील दोन निवृत्त शिक्षक स्वेच्छेने उपस्थित असतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारेही अनेक विद्यार्थी येथे अभ्यासाला येतात.
सुरुवातीला पालकांमध्ये भीती होती. रात्रीच्या वेळी मुलांना स्मशानभूमीत पाठवायला ते कचरत होते. मात्र, जसा काही पालकांनी पुढाकार घेतला, तसे हळूहळू इतरही लोक सामील झाले. दहावीत शिकणारी एक विद्यार्थिनी सांगते, लहानपणापासून आम्हाला सांगितलं होतं की तिथे भुतं असतात, त्यामुळे आम्हाला भीती वाटायची. पण आता ती भीती पूर्णपणे निघून गेली आहे. तेथे नियमित अभ्यासाला येणारी एक विद्यार्थिनी सांगते, इथं चांगला अभ्यास होतो. सायंकाळी घरात टीव्ही सुरू असतो. सर्वजण असल्याने गोंधळ असतो. त्यामुळे अभ्यास होत नाही. मात्र इथं अभ्यासासाठी शांतता मिळते.
कुठून मिळाली प्रेरणा...
सांगली जिल्ह्यातील शिराळा खुर्द गावात अशाच प्रकारे स्मशानभूमीत अभ्यास केंद्र चालवलं जातं. त्यातून प्रेरणा घेऊन आडाचीवाडीच्या ग्रामस्थांनी हा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेतला. अभ्यासासाठी घरामध्ये शांतता मिळत नसल्याने ही संकल्पना पुढे आली. अनेक मुलांच्या घरी टीव्हीचा आवाज, लहान जागा आणि इतर व्यत्ययांमुळे एकाग्रता साध्य होत नव्हती.
अभ्यासिकेचे नियम..
येथे मोबाइल फोन वापरण्यास सक्त मनाई आहे. सत्राची सुरुवात प्रार्थना आणि ध्यानाने होते. त्यानंतर दोन तास मुले पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करतात. रविवारी सुट्टी असते, पण बाकी सर्व दिवस हजेरी लावली जाते. आडाचीवाडीच्या या उपक्रमाने केवळ मुलांच्या अभ्यासाची सोय केली नाही, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अंधश्रद्धेचाही अंत केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world