Pune News : पुणेकरांसमोर सध्या एक मोठं टेन्शन आ वासून उभं आहे. ते आहे विषारी धुराचं. पुण्यात या विषारी धुरामुळे ५ विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलविण्यात आलं होतं, याशिवाय २० हजार विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. इतकच नाही या विषारी धुराच्या भीतीने एका कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देत त्या दिवसासाठी कंपनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
विषारी धुरामुळे पुणेकर त्रस्त...
ही घटना लोणी काळभोर येथून समोर आली आहे. लोणी काळभोर येथील मुळा-मुठा नदीपात्रात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला गुरुवारी २६ फेब्रुवारी रोजी आग लागली. मात्र दोन दिवसांनंतरही ही आग धुमसत होती. या आगातून येणाऱ्या विषारी धुरामुळे जवळली एमआयटी विश्वशांती गुरुकूलमधील पाच विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या परिसरात राहणाऱ्यांना अनेक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ, घसा बसणे असा त्रास झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषारी धुराच्या त्रासाने शनिवारी २८ फेब्रुवारी रोजी एमआयटी शैक्षणिक संकुलातील सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. तसेच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता परिसरातील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही शनिवारी सुट्टी देण्यात आली होती.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न...
पीएमआरडीए (PMRDA) अग्निशमन दलाच्या २५ हून अधिक गाड्या शुक्रवारी आणि शनिवारी आग विझवण्याचे काम करत होत्या. मात्र, कचरा सतत टाकला जात असल्याने आग वारंवार भडकत असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले.
पुण्यात कचऱ्याचा भीषण प्रश्न...
लोणी काळभोर येथील मुळा-मुठा नदीपात्रात निमयित मोठ्या प्रमाणात कचरा टाकून तो जाळण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात आल्या आहेत. परिणामी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग तयार होते आणि परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न उद्भवत आहेत. त्यामुळे कचरा संगलनासाठी जागा आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तांत्रिक प्रकल्प उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world