- सातगाव पठारमध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे पारंपारिक बटाटा पीक बदलत असून शेतकरी पर्यायी पिकांकडे वळले आहेत
- संतोष भिकाजी धुमाळ यांनी पाण्याचा योग्य वापर करून पॉलिहाऊसमध्ये गुलाब शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे
- गुलाबाला लग्नसराईच्या हंगामात मोठी मागणी असल्याने धुमाळ यांनी त्यावर लक्ष केंद्रित केले आहे
अविनाश पवार
राज्यभर बटाटा पिकासाठी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार हे प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पावसाची अनियमितता आणि पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे येथील पारंपारिक पीक पद्धतीमध्ये बदल होताना दिसत आहे. काही शेतकरी सोयाबीनसारख्या पर्यायी पिकांकडे वळत आहेत. तर काही जण आधुनिक शेतीचे प्रयोग करत आहेत. अशाच पद्धतीने सातगाव पठारातील शेतकरी संतोष भिकाजी धुमाळ यांनी पॉलिहाऊसमध्ये गुलाब शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यातून त्यांना लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे. त्यांनी केलेला हा प्रयोग अन्य शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे.
पाण्याची टंचाई असलेल्या या भागात धुमाळ यांनी बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करत पॉलिहाऊसमध्ये गुलाबाची लागवड सुरू केली. लग्नसराईच्या हंगामात फुलांना मोठी मागणी असते, हे लक्षात घेऊन त्यांनी गुलाब शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्या गुलाबाला केवळ राज्यातच नव्हे तर परदेशातूनही मागणी वाढत आहे. पारंपारिक शेतीमध्ये हमखास उत्पन्नाची शाश्वती राहिलेली नसताना, बदलत्या बाजारपेठेचा अभ्यास करून पीक पद्धतीत बदल केल्यास शेती फायदेशीर ठरू शकते, हे संतोष धुमाळ यांनी दाखवून दिले आहे.
नक्की वाचा - Bakrid 2026: ना कुर्बानी ना नमाज! बकरी ईद देशभर साजरी होत असली तरी 'हे' शहर आहे अपवाद
एकीकडे सरकारी धोरणे आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणात शेतकरी अडकलेला आहे. त्याच वेळी आधुनिक आणि बाजारपेठाभिमुख शेती हा पर्याय ठरू शकतो, असा संदेश त्यांच्या प्रयोगातून मिळत आहे. या गुलाब शेतीने संतोष भिकाजी धुमाळ यांना मात्र लखपती बनवले आहे. त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ही डेअरिंग केली. त्यांच्या प्रयत्नांना यश ही आलं. संतोष हे 2003 पासून गुलाब शेती करत आहेत. कमी शेतात जास्त उत्पन्न ते मिळवतात. त्यांनी टॉप सिक्रेट गुलाबाची लागवड केली आहे. या एका गुलाबाला 10 ते 12 रुपये किंमत मिळते. महाराष्ट्रा सोबतच या गुलाबांना उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश राजस्थानमध्ये मागणी आहे. तिथे दर ही जास्त मिळतो असं ते सांगतात.
ते ज्या भागात गुलाबाची शेती करतात तिथे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी शेततळं केलं आहे. शिवाय आठ बोअरवेल ही आहेत. यातून पाणी दहा दहा मिनिटांनी द्यावं लागतं. जून महिन्यात या गुलाब शेतीची लागवड केली जाते. त्यानंतर तीन महिन्यात उत्पन्न मिळायला सुरूवात होते. हे नंतर वर्षभर सुरूच राहतं. त्याला मिळणारा दर ही चांगला असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या लग्नाचा सिजन आहे. त्यामुळे गुलाबाला चांगली मागणी आहे. या काळात चांगला व्यवसाय होत असल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं. पाण्याचं योग्य नियोजन आणि मागणी नुसार पुरवठा या तत्वाने त्यांनी ही शेती यशस्वी करून दाखवली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world