
तनीषा भीसे यांच्या मृत्यूनंतर पुण्याचं दिनानाथ मंगेशकर रुग्णालय टिकेचे धनी ठरत आहे. सर्व स्तारातून रुग्णालय प्रशासनावर टिका होत आहे. या पार्श्वभूमीवर दीनानाथ रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांची पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पण पत्रकारांच्या तिखट प्रश्नामुळे केळकरांची चांगलीच कोंडी झाली. प्रश्नांना उत्तर देताना त्यांच्या नाकीनऊ आले. शेवटी त्यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. अनेक प्रश्नांना तर त्यांनी हा चौकशीचा भाग आहे असं सांगत उत्तर देणं टाळलं. शिवाय भीसे कुटुंब त्याच वेळी रुग्णालय प्रशासनाला भेटलं असतं तर हा प्रसंगच उद्भवला नसता असा अजब युक्तीवाद ही त्यांनी या निमित्ताने केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ज्या डॉक्टरांमुळे हा वाद निर्माण झाला त्या डॉ.सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिल्याचे डॉक्टर केळकर यांनी स्पष्ट केलं. त्या रुग्णालयाच्या कर्मचारी नाहीत. पण गेली 10 वर्ष त्या रुग्णालयात सल्लागार म्हणून काम करत होत्या असं ही त्यांनी सांगितलं. त्यांचा राजीनामा विश्वस्त मंडळाकडे पाठवण्यात आला आहे. तो मंजूर केला जाईल असं ही त्यांनी सांगितले. त्या दडपणाखाली आहेत. शिवाय जी टीका होत आहे ती सहन करण्याच्या पलिकडे आहे. त्याचा परिणाम इतर रुग्णावर होवू शकतो म्हणून त्यांनी हा राजीनामा दिला आहे असं ही त्यांनी स्पष्ट केलं. गुरूवारी त्यांनी पदमुक्त केलं जाईल असंही ते म्हणाले.
तनीषा भीसे यांना रुग्णालयात आणलं गेलं त्यावेळी डिपॉझिटवरून नक्की काय झालं याची ही माहिती त्यांनी यावेळी दिली.
डिपॉझीट मागण्याची पद्धत डॉक्टरांकडे नाही. प्रत्येक रुग्णाला अॅडमिशन फॉर्म दिला जातो. पण त्या दिवशी डॉक्टरांनी त्या फॉर्मवर दहा लाख डिपॉझिट लिहीले होते हे सत्य आहे हे डॉक्टर केळकर यांनी मान्य केले. असं या आधी कधीही झालेलं नाही हे सांगायला ही ते विसरले नाहीत. तशी पद्धतही नव्हती. डिपॉझिट घेण्याबाबत रुग्णालयाची एक पॉलिसी होती. त्यानुसार छोट्या रकमेच्या उपचारांसाठी डिपॉझीट घेतले जात नाही.
पण जर का पाच लाख, दहा लाखाच्या वरचे उपचार असतील तर त्यासाठी डिपॉझिट घेतले जात होते. पण आता ती अट ही आपण काढून टाकत असल्याचे डॉक्टर केळकर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या पुढे कुठलेही डिपॉझिट रुग्णालयात घेतले जाणार नाही असं ही त्यांनी सांगितलं. दरम्यान अती कामाच्या तणावामुळे रुग्णालातील कर्मचारी रुग्णांबरोबर चांगल्या पद्धतीने वागत नाहीत. ही बाब समोर आली आहे. त्या दृष्टीने एक विशेष ट्रेनिंग देण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान तनीषा भीसे प्रकरणी शासकीय अहवाल अजन आलेले नाहीत. तीन अहवाल येणार आहेत. त्याचा अभ्यास करून आपण त्यावर मत देऊ असं ही त्यांनी सांगितलं.
मंगेशकर रुग्णालयाने थकवलेला महापालिकेचा टॅक्स, रुग्णांबरोबर स्टाफची असलेली वागणूक, पेशंट सिरिअस असतानाही त्यावर उपचार न करणे, चॅरिटेबल हॉस्पिटल असताना डिपॉझिटची मागणी करणे हे आणि या सारख्या एकामागून एक विचारल्या जाणाऱ्या तिखट प्रश्नामुळे डॉक्टर केळकर हैराण झाले. तेच तेच प्रश्न विचारू नका. सरकारी चौकशीच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रश्नांना आपण उत्तर देणार नाही. अशी उत्तरे ते देवू लागले. शिवाय भीसे कुटुंब त्याच वेळी ओपीडीमध्ये बसण्या पेक्षा त्यांना रुग्णालय प्रशासन किंवा सचिन व्यवहारेंच्या चॅरिटेचे ऑफीसमध्ये आले असते तर हा प्रसंगच उद्भवला नसता असा बचाव ही त्यांनी केला. ते त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये आले, नंतर ओपीडी आणि तिथून रागाने ते निघून गेले असंही केळकर यांनी सांगितले. मात्र तरीर पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू ठेवला. त्यामुळे डॉक्टर केळकर यांनी उत्तर न देता पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. असं पळून जाणं योग्य नाही. प्रश्नांची उत्तर द्या असं पत्रकार सांगत होते. पण केळकरांनी त्याकडे कानाडोळा केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world