
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हणतात. आई शिवाय सर्व काही व्यर्थ आहे. असं असलं तरी आजच्या युगात काही मुलांना आईची किंमत नाही. अशीच एक धक्कादायक आणि तेवढीच संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ इथं घडली आहे. वृद्ध आईचा मृत्यू झाल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यास मुलांनीच नकार दिला. विशेष म्हणजे या वृद्ध महिलेला एक नाही तर आठ मुलं आहेत. पण या मुलांनी तिच्या अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवली. त्यांच्या या कृती मुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भिमाबाई नागनाथ चटके या सोलापूर जिल्ह्यातील मोहळच्या रहिवाशी होत्या. त्यांचे वय 75 वर्ष होते. त्यांना एकूण आठ मुली आहे. तर एक मुलगा आहे. आईचे वय जास्त झाल्यानंतर त्यांना ऐकता येत नव्हते. शिवाय त्यांची दृष्टीही कमी झाली होती. त्यामुळे भिमाबाईंना सांभाळण्या ऐवजी त्यांच्या मुलांनी त्यांना एक मंदिरात सोडून दिले. पुढे मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथील प्रार्थना फाउंडेशनच्या प्रसाद मोहिते आणि अनु मोहिते या दाम्पत्याने, आपल्या अनाथ आश्रमात या आज्जीना सांभाळले. पण त्यांचा 2 एप्रिलला याच अनाथ आश्रमात मृत्यू झाला.
मृत्यूची बातमी त्यांच्या मुलांना देण्यात आली. त्यावेळी 8 मुली आणि 1 मुलगा आश्रमात आले. मात्र त्या पैकी एकानेही अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला नाही. उलट 8 पैकी 5 मुलींनी आणि भावाने तेथून काढता पाय घेतला. तर 3 मुलींनी अंत्यसंस्काराचे काय ते तुम्हीच बघा असे म्हणत घरची वाट पकडली. त्यामुळे अनाथाश्रमातले लोक हैराण झाले. ज्या मुलांना जन्म दिला. लहानेचे मोठे केले. त्याच मुलांनी शेवटच्या क्षणी आपल्याच त्याच मातेला वाऱ्यावर सोडलं.
याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे ज्यावेळी भिमाबाई यांच्या पतीचे म्हणजे या मुलांच्या वडिलांचे निधन झाले, त्यावेळी भिमाबाई यांच्या वाट्याला 8 एकर जमीन आली होती. त्यावेळी मात्र या आठही बहिणी आईकडे आल्या होत्या. शिवाय आठ जणींनी मिळून आठ एकर जमीन आपसात वाटून घेतली होती. आईची संपत्ती घेतली पण आईला सांभाळण्याची जबाबदारी यातील एकाही लेकीने किंवा लेकाने घेतली नाही. काळीज नसणारी ही माणसं आहेत अशीच टिका आता होत आहे.
ट्रेंडिंग बातमी - Gold rate: सोन्याच्या भावात मोठी घसरण, आजचा भाव काय?
दरम्यान एक नाही तर आठ मुली आणि एका मुलाने भिमाबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. शिवाय पाहूण्यासारखे अनाथ आश्रमात आले आणि गेले. जसं काही झालचं नाही. उलट आता अंत्यसंस्काराचे ही तुम्हीच काही तरी पाहून घ्या असंही फाऊंडेशनच्या लोकांना सांगून गेले. अशा स्थितीत प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनी आपल्या सहकाऱ्यां सोबत भीमाबाई चटके यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world