ऋतिक गणकरवार, मुंबई
दहशतवादी आणि अंडरवर्ल्डचा एक मोठा कट उधळून लावण्यात तपास यंत्रणांना मोठे यश आले आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या आणि गेल्या काही दिवसांपासून फरार घोषित करण्यात आलेल्या हुझैफा नावाच्या दहशतवाद्याला मुंबईतून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (Maharashtra ATS) आणि दिल्ली पोलिसांच्या 'स्पेशल सेल'ने संयुक्तपणे ही धडाकेबाज कामगिरी केली आहे. हुझैफा अत्यंत हुशारीने पोलिसांना चकवा देत होता, त्याला पकडण्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी कसून छापे टाकले जात होते. अखेर 3 दिवसांच्या या शोधमोहिमेनंतर त्याला मुंबईतून जेरबंद करण्यात आले.
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!)
रेल्वेच्या अतिक्रमण कारवाईचा बदला घेण्याचा होता कट
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबईत उघडकीस आणलेल्या या दहशतवादी कटामागे एक धक्कादायक कारण समोर आले आहे. मुंबईत रेल्वेच्या जागेवर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने मोठी कारवाई केली होती. याच अतिक्रमण हटाव कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी आणि रेल्वे परिसरामध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचे नियोजन करण्यात आले होते. या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार पाकिस्तानच्या कराची शहरातून या हालचाली ऑपरेट करत होता.
दाऊदचा जवळचा साथीदार 'मुन्ना झिंगाडा' होता हँडलर
तपास यंत्रणांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणाचे धागेदोरे थेट पाकिस्तानातील अंडरवर्ल्ड आणि आयएसआयशी (ISI) जोडलेले आहेत. अटक करण्यात आलेला हुझैफा हा पाकिस्तानात लपून बसलेला दाऊद इब्राहिमचा अत्यंत विश्वासू आणि जवळचा साथीदार सय्यद मुदस्सर हुसेन उर्फ 'मुन्ना झिंगाडा' याच्या संपर्कात होता.
(नक्की वाचा- Khan Sir: खळबळजनक! खान सरांच्या कोचिंग क्लासवर गोळीबार; दोन दिवसांत संस्था उडवून देण्याची धमकी)
भारतात अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा मुन्ना झिंगाडा हा मुख्य हँडलर आहे. त्याच्याच इशाऱ्यावर हुझैफा याच्यावर मुंबईत स्थानिक पातळीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना गोळा करणे, तरुणांची माथी भडकावणे आणि घातपातासाठी लागणारे फंडिंग (पैशांचे व्यवहार) सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
हुझैफाच्या अटकेमुळे अंडरवर्ल्ड आणि आयएसआयच्या 'स्लीपर सेल'चे नेटवर्क पुन्हा एकदा समोर आले आहे. हुझैफाला मुंबईत आणि महाराष्ट्रात इतर कोणी मदत केली का? त्याला पाकिस्तानातून हवालामार्फत (Hawala) किती पैसे मिळाले होते? आणि त्याच्या रडारवर मुंबईतील कोणती महत्त्वाची ठिकाणे होती? या सर्व बाजूंचा तपास आता एटीएस आणि दिल्ली पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world