जाहिरात

Raj-Uddhav Thackeray Alliance: "आता चुकाल तर संपाल', युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

Raj-Uddhav Thackeray Alliance: आज पुन्हा एकदा मुंबईचे लचके तोडण्याचे प्रयत्न सुरू असून ज्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची होती, त्यांचेच प्रतिनिधी आज दिल्लीत बसले आहेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.

Raj-Uddhav Thackeray Alliance: "आता चुकाल तर संपाल', युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
मुंबई:

Raj-Uddhav Thackeray Yuti: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक युतीचा आज घोषणा झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. एका विशेष पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ऐतिहासिक युतीची घोषणा ठाकरे बंधुंनी केली आहे. या युतीमुळे राज्याच्या राजकारणाची सर्व गणिते बदलण्याची चिन्हे आहेत.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की,  "आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे असे संपूर्ण कुटुंब संयुक्त महाराष्ट्रासाठी लढले आहे. आज त्याच महाराष्ट्राला आणि मुंबईला तोडण्याचे कारस्थान दिल्लीतून रचले जात आहे."

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली, पण त्यानंतर काही 'उपरे' लोक नाचायला लागले होते. त्याच लोकांपासून मराठी माणसाचे रक्षण करण्यासाठी बाळासाहेबांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला. आज पुन्हा एकदा मुंबईचे लचके तोडण्याचे प्रयत्न सुरू असून ज्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची होती, त्यांचेच प्रतिनिधी आज दिल्लीत बसले आहेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.

... तर राजकारणातून खात्मा करु

ठाकरे बंधू एकत्र येण्यामागील भूमिका स्पष्ट करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जर आज आपण आपापसात भांडत राहिलो, तर तो संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या १०६ हुतात्म्यांचा अपमान ठरेल. आम्ही एकत्र आलो आहोत ते कायमचे एकत्र राहण्यासाठीच हे मी आधीच सांगितलं आहे. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा राजकारणातून खात्मा करण्यासाठी हे पाऊल आम्ही उचलले आहे."

आता चुकाल तर संपाल

भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे' या नाऱ्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, "मी मराठी माणसाला सांगतोय, आता चुकाल तर संपाल. तुटू नका आणि फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका. आगामी महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची ही युती विरोधकांच्या कपटी कारस्थानांना गाडून टाकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com