
Thane Borivali Twin Tunnel Project : राज्यातील ज्या शहरांची लोकसंख्या गेल्या काही वर्षात झपाट्यानं वाढली त्यामध्ये ठाणे शहराचा समावेश आहे. ठाण्याहून रोज हजारो जण मुंबईतील पश्चिम उपनगरात जात असतात. ठाणे आणि बोरिवली भागात जाण्यासाठी सध्या घोडबंदर रोडचा पर्याय आहे. पण, या रस्त्यावर रोज वाहतूक कोंडी होती. त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
ठाणे-बोरिवली मार्गावरील ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि हे अंतर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून 'ठाणे–बोरीवली ट्वीन टनल प्रकल्पा' तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांमध्ये बोरिवली गाठणे शक्य होणार आहे.
मुंबईकरांच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ वाचवणारा हा प्रकल्प कधी पूर्ण होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. या प्रकल्पाची आढावा बैठक आज (गुरुवार 26 जून 2025) झाली. त्यावेळी हा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
( नक्की वाचा : Pune Metro : पुणेकरांचा प्रवास होणार आणखी फास्ट, मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी )
ठाणे ते बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्प कसा पूर्ण होणार? (Thane Borivali Twin Tunnel Project)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर झालेल्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्देश दिले. त्यानुसार
- राज्यातील कोणताही पायाभूत प्रकल्प यापुढे रखडणार नाही याची दक्षता घ्या आणि प्रत्येक प्रकल्प पुढील 3 वर्षांत पूर्ण करा.
- ठाणे ते बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे.
- दुहेरी बोगदा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करा.
- बोगद्यात हवा खेळती राहण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमधील अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने करा.
- प्रकल्पाच्या निर्मितीसाठी वन विभागाची दुसऱ्या टप्प्यातील परवानगी, रात्री काम करण्याची परवानगी घेण्यात यावी.
- बोरीवली बाजूकडील काम गतीने पुढे जाण्यासाठी आणि या बाजूकडील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी धडक कार्यक्रम राबवून १ महिन्यात कार्यवाही पूर्ण करा.
- यंत्रणांनी समन्वय ठेवून प्रकल्पग्रस्तांना भाडे देऊन अथवा अन्य गृहनिर्माण प्रकल्पात पुनर्वसनासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करा.
- संबंधित अधिकाऱ्याने 1 महिना कारवाई करीत पुनर्वसन पूर्ण करावे.
- बोरीवली बाजूकडील अदानी, टाटा पॉवर प्रकल्पातील आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन करा.
- भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी अदानी पॉवर कंपनीला रस्त्याचे अंतिम नियोजन द्यावे.
कसा आहे ठाणे-बोरीवली ट्वीन टनल प्रकल्प?
ठाणे ते बोरीवली दुहेरी बोगदा 11.84 किलोमीटर लांबीचा आहे. हा प्रकल्प 2 पॅकेज मध्ये उभारण्यात येणार आहे. बोरीवली बाजूने 5.75 किलोमीटर पॅकेज 1 आणि ठाणे बाजूने 6.09 किलोमीटर पॅकेज 2 असणार आहे. पॅकेज 1 मध्ये ₹6,178 कोटी आणि पॅकेज 2 मध्ये ₹5,879 कोटी अशाप्रकारे एकूण 12,057 कोटी रुपये खर्च या प्रकल्पाला अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कार्बन उत्सर्जन प्रतिवर्ष 1.4 लाख मेट्रिक टनाने कमी होणार. सध्याच्या रस्त्याने ठाणे ते बोरीवली जायला एक ते सव्वा तास लागतो. बोगदा पूर्ण झाल्यानंतर हा कालावधी 15 मिनिटांवर येणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर इंधनही वाचणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world