Thane News: ठाण्यात 'शिंदे' गटाला मोठा धक्का! बिनविरोध निवडून आलेल्या सुलेखा चव्हाण यांचं नगरसेवक पद धोक्यात

Thane News: ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून बिनविरोध निवडून आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रिझवान शेख, ठाणे

Thane News: ठाणे महानगरपालिकेच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे मनपाच्या प्रभाग क्रमांक 5 मधून बिनविरोध निवडून येत इतिहास रचणाऱ्या शिवसेनेच्या (शिंदे गट) बहुचर्चित नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवक पद आता धोक्यात आले आहे. सुलेखा चव्हाण यांनी निवडणुकीदरम्यान सादर केलेले आदिवासी जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले आहे. धुळे जात पडताळणी विभागाने ते अवैध ठरवले आहे.

धुळे जात पडताळणी विभागाचा मोठा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, सुलेखा चव्हाण यांच्या जात प्रमाणपत्राबाबत धुळे जात पडताळणी विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर सखोल चौकशी केल्यानंतर, विभागाने सुलेखा चव्हाण यांचे आदिवासी जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Nashik MLC Election: नाशकात सर्वात मोठा उलटफेर! गोकुळ गितेंचा 'गनिमी कावा'; नरेंद्र दराडेंचा पराभव करत विजयी)

जात पडताळणी विभाग या संपूर्ण प्रकरणाची आणि निर्णयाची अधिकृत माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्राद्वारे निदर्शनास आणून देणार आहे. सादर केलेले प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे नियमानुसार सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची कायदेशीर शक्यता निर्माण झाली आहे.

लकी जाधव यांनी उघडकीस आणले प्रकरण

'अखिल भारतीय विकास परिषद' या संघटनेचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष लकी जाधव यांनी हा बोगस जात प्रमाणपत्राचा प्रकार कायदेशीर पाठपुरावा करून उघडकीस आणला आहे. या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत लकी जाधव यांनी इशारा दिला आहे. 

(नक्की वाचा-  ओमराजे निंबाळकर अ‍ॅक्शन मोडमध्ये! ठाकरे गटातून बाहेर पडताच या अधिकाऱ्याच्या बदलीची केली मागणी)

"सुलेखा चव्हाण यांचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर आता प्रशासनाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांचे पद रद्द केले पाहिजे. जर येणाऱ्या काळात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, तर आम्ही शिंदे सेना आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाविरोधात तीव्र आंदोलन छेडू", असा इशाराही लकी जाधव यांनी दिला आहे.

विशेष म्हणजे, लकी जाधव यांच्या या भूमिकेला आणि आंदोलनाच्या इशाऱ्याला आता विरोधी पक्ष असलेल्या ठाकरे गटानेही पूर्ण पाठिंबा दिला आहे. यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून ठाण्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.

Topics mentioned in this article