Thane Fire News: ठाणे रेल्वे स्टेशन परिसराजवळ असलेल्या गावदेवी मार्केटच्या इमारतीमध्ये गुरुवार (21 मे) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्यासह महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आग विझवताना अग्निशमन दलाचे इतर दोन कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत, त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या भीषण आगीत संपूर्ण मार्केट जळून त्याचा कोळसा झाला आहे.
मध्यरात्री गाढ झोपेत असताना काळाचा घाला (Tragedy strikes at midnight during deep sleep)
ठाणे महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील नौपाडा भागातील गोखले रोडवर असलेल्या गावदेवी भाजी मार्केटच्या (गामदेवी बाजार परिसर) इमारतीमध्ये गुरुवारी पहाटे 3.45 वाजेच्या सुमारास ही आग लागली. ज्यावेळी आग लागली, त्यावेळी परिसरात सर्व लोक गाढ झोपेत होते. त्यामुळे सुरुवातीला आगीची घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. हळूहळू या आगीने रौद्ररूप धारण केले आणि ती आजूबाजूच्या स्टॉल्समध्ये पसरत गेली. जळत्या स्टॉल्समधून निघणाऱ्या आगीच्या ज्वाळा आणि सर्वत्र पसरलेल्या धुरामुळे परिसरात एकच घबराट तसेच दहशतीचे वातावरण निर्माण झाले. काही वेळाने आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला आणि पोलिसांना याची माहिती दिली.
'ब्रिगेड कॉल' घोषित, ठाणे शहराची यंत्रणा घटनास्थळी ('Brigade Call' declared, Thane city machinery rushed to the spot)
या मार्केटमध्ये भाजी आणि फळांच्या बाजारासोबतच कपड्यांचेही अनेक स्टॉल्स होते. तसेच स्थानिक महानगरपालिकेचे एक वॉर्ड ऑफिसही याच परिसरात आहे. कपड्यांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील कपड्यांचा साठा असल्याने आगीने काही वेळातच संपूर्ण बाजारपेठेला वेढले. आगीचे भीषण रूप पाहून प्रशासनाकडून तातडीने ‘ब्रिगेड कॉल' (जास्तीत जास्त अग्निशमन संसाधनांची आवश्यकता असलेली आणीबाणीची स्थिती) घोषित करण्यात आला.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांसह शहरभरातील सर्व अग्निशमनदलाची वाहने आणि RDMC पथक घटनास्थळी दाखल झाले. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशांत रोडे आणि आरडीएमसीचे प्रमुख यासीन तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ आग विझवण्याचे तसेच बचावकार्य सुरू करण्यात आले. पण दुकानांमधील कपड्यांमुळे आग वेगाने पसरत असल्याने जवानांना आग आटोक्यात आणण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
(नक्की वाचा: Kalyan News: कल्याणमधील झाडांवर विषप्रयोगाचा संशय, छिद्र करून विषारी रसायन भरलं?)
कर्तव्य बजावताना अग्निशमन अधिकाऱ्यासह मनपाच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू (Fire officer and civic security guard lose lives on duty)
आग विझवण्याच्या मोहिमेदरम्यान दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख पटली असून सागर शिंदे (वय 43 वर्ष) आणि काळू शंकर गाडेकर (वय 53 वर्ष) अशी त्यांची नावे आहेत. सागर शिंदे हे ठाणे अग्निशमन दलात अधिकारी (स्टेशन ऑफिसर) म्हणून कार्यरत होते, तर काळू शंकर गाडेकर हे महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक (सिक्युरिटी गार्ड) म्हणून तैनात होते. कर्तव्यावर असतानाच या दोघांना आपले प्राण गमवावे लागले.
या आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाचे इतर दोन अधिकारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. सुजीत पाष्टे (वय 45 वर्ष) आणि तांडेल समीर जाधव (वय 40 वर्ष) अशी अधिकाऱ्यांची नावं आहेत. या दोन्ही जखमी कर्मचाऱ्यांवर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (कळवा) उपचार सुरू आहेत.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट (Cause of the fire still uncertain)
या भीषण आगीत गामदेवी बाजारपेठेतील भाजी, फळे आणि कपड्यांची दुकाने पूर्णपणे जळून नष्ट झाली असून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम पूर्ण झाले असून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. ठाणे पोलीस आणि पालिकेचे अधिकारी या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करत आहेत.
(Content Source: PTI/IANS)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world