Thane Metro 10: ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ठाणे–मिरा भाईंदर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गायमुख (रेतीबंदर) ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (घोडबंदर) या मेट्रो-10 प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. काशीगाव ते दहिसर चेक नाका या महत्त्वाच्या जोडणीनंतर पुढील आठवड्यात गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या 9.7 कि.मी. अंतराच्या उन्नत मेट्रो प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एमएमआरडीएत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रकल्पाचा खर्च किती?
दहिसर -काशीगाव मार्गाचा गायमुख मार्गापर्यत विस्तार करून तो गायमुख पर्यंत नेण्यात येणार असून या प्रकल्पासाठी सुमारे 8,553 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. वर्ष 2029 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
या भागांमध्येही पॉडटॅक्सी सेवा
ठाणे, मिरा भाईंदर आणि नवी मुंबई येथे पॉडटॅक्सी प्रकल्प पीपीपी तत्त्वावर राबवण्याचा मानस असून पुढील सहा महिन्यांत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पूर्ण केला जाणार असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
मराठी भाषा बंधनकारक
बेकायदेशीर बाइकटॅक्सी सेवांवर कारवाई करत ओला, उबर आणि रॅपिडो यांच्या परवान्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. राज्यात रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात आले असून 1 मेपर्यंत तपासणी करून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला.

Photo Credit: NDTV Marathi
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world