
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर कायम असून, ठाणे महानगरपालिकेने शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना 19 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागाकडून ठाणे जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या 'रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
नक्की वाचा: 19 ऑगस्ट रोजी शाळा कॉलेजना सुट्टी मिळणार? उद्याही मुसळधार पावसाचा अंदाज
ठाणे महापालिकेने काढले परिपत्रक
ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, शहरातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमांच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना तसेच अनुदानित व विनाअनुदानित शाळांना मंगळवार, 19 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी असेल. या आदेशात शहरातील महाविद्यालयांचाही समावेश करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या, सर्व प्रकारच्या शाळांना दि..१८ ऑगस्ट, २०२५ आणि दि. १९ ऑगस्ट, २०२५ रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. pic.twitter.com/uPVVIXx93A
— Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका (@TMCaTweetAway) August 18, 2025
परीक्षांचे पुनर्नियोजन करण्याच्या सूचना
परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, "ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अतिवृष्टीमुळे शहरातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे." ही सुट्टी केवळ विद्यार्थ्यांसाठी असून, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मात्र मुख्यालयात उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, 19 ऑगस्ट रोजी नियोजित असलेल्या सर्व परीक्षा, इत्यादी नजीकच्या काळात योग्य वेळेत पुन्हा आयोजित केल्या जातील, असेही कळवण्यात आले आहे.
नक्की वाचा: कोसळधारमुळे मुंबईची झाली तुंबई! रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम, धडकी भरवणारे 25 PHOTOS
विद्यार्थी-पालकांना दिलासा
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ठाण्यातील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे, ज्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी हवामान विभागाकडून मिळालेल्या इशाऱ्याचा आढावा घेऊन हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनीही सतर्क राहावे आणि आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world