सूरज कसबे
आषाढी एकादशीच्या निमित्ताने, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आळंदी देवस्थानच्या वतीने ते जाहीर करण्यात आले आहे. 29 जून शनिवार संध्याकाळी ४ वाजता, माऊलींच्या पालखी संजीवन समाधी मंदिरातून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे. पहिला मुक्काम हा माऊलींचे आजोळ असलेल्या गांधी वाड्यात होणार आहे. तर ३० जून रविवार रोजी पालखी आळंदीहून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
असा असणार आहे माऊलींच्या पालखीचा मार्ग
29 जून आळंदीहून प्रस्थान आणि गांधी वाडा इथे मुक्कामी असणार आहे. 30 जून आळंदीहून पुण्याच्या दिशेनं पालखी मार्गस्थ होईल. 15 जुलैला पालखी वाखरीला पोहचणार आहे. तर 16 जुलैला वाखरी ते पंढरपूर असा प्रवास होईल.
17 जुलै रोजी मुख्य आषाढी एकादशी पंढरपूर यात्रेचा सोहळा असणार आहे.
असा असणार रिंगण सोहळा
आळंदी ते पंढरपूरच्या वाटेवर माऊलीच्या पालखीचे गोल आणि उभे रिंगण सोहळे पार पडत असतात, यात पालखी प्रदक्षिणा होत असते. माऊलीचे मानाचे अश्व आणि चोपदाराचे अश्व या रिंगण सोहळयात धावत असतात. ज्या ठिकाणाहून अश्व धावले त्या ठिकाणची माती कपाळाला लाऊन वारकरी बांधव दर्शन घेत असतात. पुढं मानाच्या दिंड्यामधील टाळकरी, विणेकरी, पखवाजे, तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला या रिंगणात धावत असतात. ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात चाललेला हा रिंगण सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो.
पहिले उभे रिंगण 8 जुलै चांडोबाचा लिंब
पहिले गोल रिंगण 12 जुलै पुरंद वडे
दुसरे गोल रिंगण 13 जुलै खुडुस फाटा
तिसरे गोल रिंगण 14 जुलै ठाकूर बुवाची समाधी
दुसरे उभे रिंगण 15 जुलै बाजीरावाची विहीर
चौथे गोल रिंगण 15 जुलै बाजीरावाची विहीर
तिसरे उभे रिंगण 16 जुलै वाखरी पादुका आरती
असा असणार पालखी परतीचा प्रवास
20 जुलैपर्यंत माऊलींची पालखी पंढरपूर नगरीत विसावेल. २१ जुलैला श्रींचे चंद्रभागा स्नान, गोपाळपूर काला व श्री विठ्ठल रुक्मणी भेट , पादुकां जवळ विसावा व सोहळा परतीच्या प्रवासासाठी आळंदीकडे निघणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world