Mumbai News: मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान म्हणजेच राणीच्या बागेत काही दिवसांपूर्वी एका वाघाचा मृत्यू झाला होता. वाघाचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. शक्ती नावाच्या वाघाचा 17 नोव्हेंबरला मृत्यू झाला. तो त्यावेळी नऊ वर्षे आणि सहा महिन्याचा होता. त्यावेळी ‘शक्ती' या वाघाचा मृत्यू श्वसननलिकेत हाड अडकल्याने झाल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यामागचे नक्की कारण काय आहे हे आता मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या वाघाचा मृत्यू न्यूमोनियाची बाधा झाली होती. त्यानंतर त्याची श्वसन प्रणाली बंद झाल्याने त्याचा मृत्यू ओढवला आहे, असे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयातून 12 फेब्रुवारी 2020 रोजी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात शक्ती आणि करिश्मा ही रॉयल बंगाल वाघाची जोडी देवाण-घेवाण तत्त्वावर आणली होती. तेव्हापासून ही जोडी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचे मुख्य आकर्षण ठरली होती. उद्यानात येणारे पर्यटक शक्ती व करिश्माला पाहण्यासाठी गर्दी करीत होते. शक्ती वाघाने 15 नोव्हेंबरला काहीही खाल्ले नव्हते. त्यामुळे त्याला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. तसेच पाण्यातून औषधही देण्यात आले. 16 नोव्हेंबरला शक्तीने कोंबडीचे थोडे मांस खाल्ले व पाणी प्यायले. त्यानंतर त्याला उलटीचा उमाळा (Retching) आला.
17 नोव्हेंबर ला शक्ती वाघाची आरोग्य तपासणी करण्यासाठी पिंजऱ्यात घेत असताना त्याला अचानक अपस्माराचे झटके (Convulsion) आले. त्यातच दुपारी सव्वा बारा वाजता त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी शक्तीला कुठल्याही प्रकारच्या आजारपणाचे लक्षण नव्हते. शक्तीच्या मृत्यूनंतर त्याच दिवशी दुपारी अडीच वाजेपासून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय (परळ) येथील पशुवैद्यकीय पॅथेलॉजी विभागातील प्रोफेसर आणि त्यांच्या चमूने त्याचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार शक्तीचा मृत्यू हा न्यूमोनिया बाधा होवून श्वसन प्रणाली बंद झाल्याने ओढवल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल आल्यानंतर मृत्यूच्या कारणाचा अहवाल सादर केला जाईल, असे प्राणिसंग्रहालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच शक्ती वाघाच्या अवयवांचे नमुने नागपूर येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (गोरेवाडा) येथे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. शक्ती वाघाच्या मृत्यूची सविस्तर माहिती नियमानुसार केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (Central Zoo Authority) व महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (Maharashtra Zoo Authority) यांना 18 नोव्हेंबरला इ-मेलद्वारे कळविण्यात आली आहे. प्राणिसंग्रहालयातील शिष्टाचारानुसार शक्ती वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान सद्यस्थितीत, प्राणिसंग्रहालयात ‘जय' हा वाघ आणि ‘करिश्मा' ही वाघिण प्रदर्शनीसाठी उपलब्ध आहेत.
नक्की वाचा - Tata Sierra: टाटा सिएराची धमाकेदार एन्ट्री! किंमत, फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल,'आहा!,
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world