Palghar News Today : सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून समुद्रकिनाऱ्यावर कार नेणे एका पर्यटकाला चांगलेच महागात पडले असते.मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.वसई तालुक्यातील प्रसिद्ध 'कळंब समुद्रकिनाऱ्यावरील'(Kalamb Beach) हा धक्कादायक प्रकार सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रकिनाऱ्यावर चारचाकी वाहने नेण्यास सक्त मनाई आहे. असं असतानाही पर्यटनासाठी आलेल्या काही पर्यटकांनी उत्साहाच्या भरात त्यांची निळ्या रंगाची कार थेट समुद्राच्या पाण्याच्या जवळ नेली.
बघता बघता समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली अन्..
पर्यटक किनाऱ्याचा आनंद घेत असतानाच समुद्राला भरती सुरू झाली. बघता बघता पाण्याची पातळी वाढली आणि कारचे चाक वाळूत व पाण्यात अडकले.लाटांच्या तडाख्यामुळे कार समुद्राच्या दिशेने ओढली जाण्याची आणि पाण्यात बुडण्याची भीती निर्माण झाली होती.पर्यटकांचा हा अतिउत्साह त्यांच्या अंगलट आल्याचे पाहून तिथे एकच गोंधळ उडाला.घटनेचे गांभीर्य ओळखून किनाऱ्यावरील स्थानिक रहिवासी,दुकानदार आणि इतर काही पर्यटकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली.व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की,जवळपास 15 ते 20 जणांनी एकत्र येऊन भरतीच्या लाटांशी लढा देत कारला जोरदार धक्का मारून कारला सुरक्षितपणे पाण्याच्या बाहेर काढले.
इथे पाहा कळंब समुद्र किनाऱ्यावरील व्हायरल व्हिडीओ
स्थानिकांनी वेळीच दाखवलेल्या या तत्परतेमुळे कार समुद्रात वाहून जाण्यापासून वाचली आणि पर्यटकांचे मोठे आर्थिक नुकसान टळले.पर्यटकांनी अशा प्रकारे किनाऱ्यावर वाहने आणून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये,असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जाते.या घटनेनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून या पर्यटकांच्या बेजबाबदारपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.तर दुसरीकडे कार बाहेर काढणाऱ्या स्थानिक सुजाण नागरिकांचे भरभरून कौतुक होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world