नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मृत्यूने गाठलं, श्वास गुदमरुन चार कामगारांचा अंत

सांडपाणी साठवत असलेल्या टाकीत उतरल्यामुळे हा दुर्देवी प्रकार घडला. चारही कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाला यश मिळालं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
अग्नीशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळावर रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान...
विरार:

संपूर्ण राज्यभरात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. परंतु विरार पश्चिम भागातील ग्लोबल सिटी भागात एका खासगी सांडपाणी प्रक्रीया प्रकल्पात एका दुर्देवी घटनेमुळे चार कामगारांना आपला प्राण गमवावा लागला आहे. प्रकल्पाच्या टाकीत गेलेल्या चार कामगारांचा श्वास गुदमरुन मृत्यू झाला आहे. दुपारी दीड वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या मदतीने या चारही कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक यंत्रणांना यश आलं आहे.

शुभम पारकर, अमोल घाटाळ, निखील घाटाळ आणि सागर तेंडुलकर अशी चार मृत कामगारांची नावं आहेत. या चारही कामगारांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघात घडलेला प्रकल्प हा खासगी विकासकाचा असल्याचं कळतंय.

प्लांटमध्ये काम करणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला एक कामगार हा टाकीमध्ये कामासाठी खाली उतरला होता. परंतु बराच काळ झाला तरीही तो बाहेर न आल्यामुळे त्याला शोधण्यासाठी दुसरा कामगार खाली उतरला. परंतु त्यालाही बाहेर येण्यात उशीर झाल्यामुळे एकामागोमाग एक चार कामगार टाकीत शिरले. याचदरम्यान श्वास गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला. सांडपाण्यावर प्रक्रीया होत असल्यामुळे रिकाम्या टाकीत अनेक गॅस तयार होतात. याच गॅसमुळे कामगारांचा श्वास गुदमरुन जीव गेला असल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.

या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आलं. अग्नीशमन दलाच्या जवानांनी दुपारी १ वाजल्याच्या दरम्यान तीन कामगारांना बाहेर काढण्यात यश मिळवलं. अमोल घाटाळ याचा मृतदेह दोन वाजल्याच्या दरम्यान बाहेर काढण्यात आला. या चारही कामगारांनी सुरक्षेचा उपाय म्हणून मास्क घातले होते अशीही माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली. परंतु या मृत्यूचं नेमकं कारण काय हे चौकशीअंती समोर येऊ शकतं. दरम्यान घडलेल्या घटनेमुळे परिसरात गंभीर वातावरण पहायला मिळत आहे.

Advertisement

अवश्य वाचा - ऑनलाईन ऑर्डर केलेला केक खाल्ल्यानं 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, Zomato नं केली मोठी कारवाई


 

Topics mentioned in this article