
आज सायंकाळी साडे चारच्या सुमारास पु्ण्यातील सिटी पोस्ट परिसरातील पोस्ट ऑफिसरच्या इतिहासकालीन इमारतीच्या समोर एक मोठं भगदाड पडलं. या भगदाडात पुणे महानगरपालिकेचा (Pune News) अख्खाच्या अख्खा ट्रकच कोसळला. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर स्वच्छतेसाठी आलेला पुणे महानगरपालिकेचा अख्खा ट्रक या भलामोठ्या खड्ड्यात अदृश्य झाला. याशिवाय तेथेच पार्क केलेल्या दोन दुचाकीही खड्ड्यात गेल्याचं व्हिडिओमधून दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या खड्ड्याच्या खालीच भूमिगत मेट्रोचं (Pune Metro) काम सुरू आहे. त्यामुळे मेट्रोसारख्या विकासकामांमुळे पुण्याची सुरक्षा धोक्यात आली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
हा खड्डा पोस्ट ऑफिसच्या इतिहासकालीन इमारतीच्या समोर पडला असल्याने त्या इमारतीलाही धोका निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. येथून काही अंतरावर पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचंही मंदिर आहे. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. ट्रक कोसळत असताना चालक वेळीच तेथून बाहेर पडल्याने तो बचावला आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world