यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune Koyta Gang News : पुण्यातील कोंढवा परिसरात किरकोळ वादातून काही तरुणांनी कोयते फिरवत दहशत माजवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेदरम्यान मशिदीच्या इमामवरही हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र,स्थानिक नागरिकांनी संयमाची भूमिका घेत हिंदू-मुस्लीम एकोप्याचे दर्शन घडविले.
घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. भररस्त्यात कोयते फिरवत काही तरुणांनी दहशत निर्माण केल्याने स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
नक्की वाचा >> Trending News: वाहनांना टोल प्लाझावर थांबण्याची गरज नाही, FASTag नंतर आता 'ही' नवी टोल सिस्टम होणार लागू
कोंढवा परिसराची आहे आगळीवेगळी ओळख
स्थानिक नागरिकांनी या घटनेला कोणताही जातीय रंग न देता शांतता राखण्याचे आवाहन केले.कोंढवा परिसर हा विविध धर्मीय नागरिकांच्या एकोप्यासाठी ओळखला जातो.अनेक वर्षांपासून हिंदू-मुस्लीम बांधव येथे शांततेत आणि सलोख्याने राहत असून काही समाजकंटकांमुळे परिसराची प्रतिमा खराब होऊ नये,अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.मशिदीच्या इमामवर झालेल्या हल्ल्याबद्दल सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.धार्मिक स्थळांशी संबंधित व्यक्तींवर हल्ले होणे गंभीर बाब असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई व्हावी,अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
नक्की वाचा >> Cannes महोत्सवात 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीचीच चर्चा, पंढरपूरच्या चित्रकाराचं सातासमुद्रापार कौतुक
अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात
पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राखावा,असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world