शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपने समाजात भेदाभेद करण्याचं काम केलं. केंद्राची सत्ता, शासकीय यंत्रणा सगळ्यांनी मिळून उद्धव ठाकरेला नेस्तनाबूत करायचे ठरवले आहे. मात्र मला त्याची पर्वा नाही. सगळ्यांच्या छाताडावर बसून भगवा (Uddhav Thackeray Dusara Melava) फडकवल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हान उद्धव ठाकरे यांना विरोधकांना दिलं आहे. उद्धव ठाकरे शिवाजी पार्क येथील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलत होते. मुंबईच्या दसरा मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्य सरकारच्या योजनांसह भ्रष्टाचाराचा मुद्द्यावर संताप व्यक्त केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जय शिवराय हा महाराष्ट्राचा मंत्र असल्याचं म्हटलं. प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर स्थापन करणार असल्याचं म्हटलं आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, माझं सगळं काही ओरबाडून घेतल्यानंतरही तुम्ही आई जगदंबेसारखं माझ्या पाठिशी उभे राहिलात. दिल्लीतून कोणीही येऊदेत. त्यांना गाडून त्यांच्या उरावर भगवा फडकवून दाखवेन.
आताचे उद्योगपती मिठागरं गिळतायेत..
दरवर्षी शिवसेनेला नवे अंकूर फुटत आहेत. भगवे झेंडें आता मशाली झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी देशाचे उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. टाटांसारखे उद्योगपती वेगळे असतात. टाटांनी देशाला अनेक गोष्टी दिल्या. टाटांनी मीठ दिलं. आताचे उद्योगपती मिठागरं गिळतायेत. त्यामुळे टाटा गेल्याचं वाईट वाटतंय आणि हे उद्योगपती जात का नाही याचं वाईट वाटतंय.
नक्की वाचा - कावळ्यांकडे दिला कारभार, त्याने हगून भरला दरबार! संजय राऊतांची टीका
यावेळी उद्धव ठाकरेंनी रतन टाटा घरी आल्याचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, टाटा एकदा घरी आले होते, बराच वेळ बसले. गप्पा मारल्या. निघताना मला सांगितलं, तुला आणि मला खूप मोठी परंपरा लाभली आहे. आरडीनंतर जेव्हा मी काम सांभाळायला सुरुवात केली तेव्हा बरेचदा कोणताही निर्णय घेताना जेआरडी असते तर काय केलं असतं असा विचार यायचा. त्यामुळे मी निर्णय घेऊ शकत नव्हतो. मात्र माझा वारसा समर्थपणे पेलू शकतो असं शिवसेनाप्रमुखांना वाटलं तेव्हा त्यांनी तुझ्यावर जबाबदारी सोपवली. त्यामुळे तुझे निर्णय बिनधास्तपणे घे.
भाजप आम्हाला संपवायला निघालेत...
आम्ही भाजपला लाथ घातली. कारण त्यांचं हिंदुत्व गोमूत्रधारी बुरसटलेलं हिंदुत्व आहे. जा त्या मिंध्यांना सांगा. तुझा विचार हा बाळासाहेबांचा विचार नाही. हे शेपूट हलवणारे कुत्रे आहेत. मला कुत्र्यांचा अपमान करायचा नाही. मी श्वान प्रेमी आहे. पण लांडगा प्रेमी नाही. ते वाघाचं कातडं पांघरण्याचा प्रयत्न करातयात. पण काय काय उघडं पडतंय हे त्यांच्या लक्षात येत नाही. हे महाभारत आहे. कौरवांनी सांगितलं होतं की, सुईच्या अग्रावर येईल इतकीची जमीन देणार नाही. हीच त्यांची वृत्ती आहे. भाजपचा हाच प्रयत्न आहे. ते आम्हाला संपवायला निघालेत.
जी परिस्थिती अर्जुनाशी झाली होती तीच माझी झाली आहे. महाभारतात अर्जुनाला वाटत होतं, कोणाशी लढू.. माझेच आप्त स्वकीय शस्त्र घेऊन उभे राहिले आहेत. ज्यांना मी मोठं केलं. तिच माणसं माझ्यावर चालून येत आहेत. त्यामुळे अर्जुनाला गीता सांगावी लागली. गीतेत सांगितल्याप्रमाणे शत्रूला ठेचलाच पाहिजे. कृष्णाने अर्जुनाला बळ दिलं. कृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला. पण ती प्रत्यक्षास आणली शिवाजी महाराजांनी. जो स्वराज्यावर चालून येतो. त्या शत्रुचा शिरच्छेद केलाच पाहिजे.
नक्की वाचा - Eknath Shinde : 'मला मुख्यमंत्री करा म्हणत दिल्लीत कोण फिरतंय?'; CM शिंदेंची ठाकरेंवर सडकून टीका
जय श्रीराम' म्हणतो तसंच 'जय शिवराय' म्हणणार
प्रभू रामाबरोबरच वानरसेना होती. आपण त्यांना देव मानतो. आपण जय श्रीराम म्हणतो. मग छत्रपती शिवराय कोण होते? प्रभू रामाने दैत्य मारले, शिवरायांनीदेखील राक्षस मारले. भाजपने केवळ मतांसाठी महाराजांचा पुतळा उभारला. मात्र त्यातही पैसा काढला. आठ महिन्यात पुतळा कोसळला. आम्ही राजांचे पुतळे उभारत नाही, तर त्याची पुजा करतो. आम्ही प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचं मंदिर बांधणार. हो आम्ही देव्हाऱ्यात महाराजांची पूजा करणार. जसं जय श्रीराम म्हणतो तसचं जय शिवराय म्हणणार. प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार. 'जय श्रीराम' म्हणतो तसंच 'जय शिवराय' म्हणणार. मंदिरात केवळ मंत्रोच्चार करणार नाही. तर महाराजांच्या आयुष्यातील प्रसंग शिवचरित्राच्या रुपात कोरले गेले पाहिजे. जयंती आणि राज्यभिषेक दिनापुरते आमचं दैवत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशात पहिलं आरमार उभारलं, त्यावरून आयएनएस शिवाजी आलं. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर उभारेनच शिवाय देशातील प्रत्येक राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारले गेले पाहीजे. मंदिर केवळ मंत्रोच्चारासाठी नाही तर त्यांच्या आयुष्यातील प्रसंग मंदिर आणि आसपासच्या परिसरात कोरले जातील किंवा दाखवले जातील. शिवजयंती आली, राज्याभिषेक दिन आला की पुतळा साफसूफ करायचा, हार घालायचा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं, इतक्यापुरता आमचे दैवत नाही. दुसरा कोणता राजा आहे की 400 वर्ष झाल्यानंतरही ज्याचा जयघोष झाल्यानंतर मुडदाही उठून उभा राहील?
नक्की वाचा - Suraj Chavan-Ajit Pawar : सूरज चव्हाणला अजित पवारांकडून मिळालं आयुष्यभर लक्षात राहील असं गिफ्ट
सध्याचा भाजप हा हायब्रीड झालाय..
शिवाजी महाराज म्हणजे मते मिळवण्यासाठीचे ईव्हीएम नाही. ईव्हीएमसारखा महाराजांचा वापर करू नका. महाराजांच्या मंदिराला विरोध करेल त्याला महाराष्ट्र बघून घेईल. आज संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहे. मला संघ, संघाचे कार्यकर्ते, सरसंघचालकांबद्दल आदर आहे, मात्र ते जे काही करत आहे त्याबद्दल आदर नाहीये. सरसंघचालकांनी म्हटले की हिंदूंनो स्वसंरक्षणासाठी एकत्र या, म्हणजे काय? 10 वर्षे झाली विश्वगुरू बसलेत, अजून तुम्ही हिंदूंचे संरक्षण करू शकत नाही ? तुमचे रक्षण तुम्ही करा, आम्ही नालायक आहोत, तरी तुम्ही निवडून दिलंत, तरीही तुमचे रक्षण करू शकत नाही. मग कशाला हवेत मोदी ? संपूर्ण देशाने तीनवेळा सत्ता देऊनही तुम्ही म्हणत असाल की हिंदू खतरें मे है, तर मी म्हणेन की काँग्रेस बरी होती. कारण तेव्हा तुम्हीच म्हणातायत की इस्लाम खतरे मे है. सरसंघचालकांनी म्हटले की, जगभरात सरकारे पाडली जात आहे, अस्थिरता माजवली जात आहे. मग अल्पसंख्याक धोक्यात येतात. लेकी बोले सुने लागे अशी म्हण आहे. सरसंघचालक बांग्लादेशाला बोलतायत म्हणजे सुने बोले, लेकी लागे असे आहे का ? मला गद्दारी करून खाली खेचले ते दिसले नाही? गद्दारी करून, शकुनी मामाने आमचे सरकार खाली खेचले आणि गद्दारांना ऊरावर घेून राज्य करत आहे. संघाला सध्याची भाजप मंजूर आहे का ? सध्याचा भाजप हा हायब्रीड झालाय. इतर पक्षांचे नेते भाजपच्या गर्भात घुसलेत, तो भाजप आमच्यावर राज्य करणार आहे ? भाजपला, भारतीय म्हणायला आणि जनतेचा पक्ष म्हणायला लाज वाटली पाहीजे. गद्दार आणि चोरांना नेता मानून तुम्हाला आमच्याशी लढायला लागतंय यातच तुमचा पराभव आहे.
किती भ्रष्टाचार करत आहात ? हिंदुत्व म्हणजे नेमकं आहे काय? गायीला राज्यमातेचा दर्जा दिला. देशी गायीला वाचवलेच पाहीजे, पण गाय राज्यमाता झाली, मराठी अभिजात भाषा झाली तर मग राज्याची राज्यभाषा कोणती ? हंबरणे ही राज्यभाषा होणार का ? तसे असेल तर कोवळ्या मुलींवर होणाऱ्या अत्याचारांमुळे फोडणारा हंबरडा तुमच्या कानावर का पडत नाही?
हरियाणात 22 ,23 वर्षांच्या तरुणाचा पाठलाग करून खून करण्यात आला. कथित गोरक्षकांनी त्याचा खून केला. संशय असा होता की तो गाडीतून गोमांस घेऊन जात होता. निघाला कोण आर्यन मिश्रा. हिंदू मारला गेला. तोच जर आर्यन खान असता, आर्यन शेख असता तर आगडोंब उसळला असता. गोमांसाची तस्करी केली म्हणून आर्यन मिश्राला ठार मारलं तर गोमांस खाणाऱ्या किरण रिजिजूंचं काय ? हा दुतोंडीपणा का ?