जाहिरात

वसईत खळबळ! प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या विवाहित तरुणाचा अचानक मृत्यू, नेमकं काय घडलं?

Vasai News: नालासोपारा येथे राहणाऱ्या या तरुणाचे विरारमध्ये वास्तव्यास असलेल्या एका तरुणीशी गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. शनिवारी तो आपल्या प्रेयसीला घेऊन कळंब समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या आनंदी जीवन फार्म या लॉजवर दाखल झाला होता.

वसईत खळबळ! प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या विवाहित तरुणाचा अचानक मृत्यू, नेमकं काय घडलं?

प्रेयसीसोबत एका लॉजवर गेलेल्या 33 वर्षीय विवाहित तरुणाचा अचानक आणि संशयास्पद मृत्यू झाल्याने वसईत एकच खळबळ उडाली आहे. वसई तालुक्यातील कळंब समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या 'आनंदी जीवन फार्म' या लॉजमध्ये घडलेल्या या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले असून, मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी अर्नाळा सागरी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.

नालासोपारा येथे राहणाऱ्या या तरुणाचे विरारमध्ये वास्तव्यास असलेल्या एका तरुणीशी गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. शनिवारी तो आपल्या प्रेयसीला घेऊन कळंब समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या आनंदी जीवन फार्म या लॉजवर दाखल झाला होता. काही वेळ दोघांनी एकत्र घालवला. मात्र, अचानक तरुणाच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. काही क्षणातच त्याची प्रकृती गंभीर होत गेली. हा प्रकार लक्षात येताच घाबरलेल्या प्रेयसीने तात्काळ लॉजच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तरुणाला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

(नक्की वाचा-  Kalyan News: विरार-अलिबाग कॉरिडॉरचा म्हाडाला फटका! कल्याणमधील गृहप्रकल्पाच्या जमिनीतून जाणार रस्ता)

एनर्जी ड्रिंक्स पिण्याची सवय

या अचानक मृत्यूमुळे लॉज परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लॉजमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, प्रेयसी आणि लॉज कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान, मृत तरुणाला एनर्जी ड्रिंक्स पिण्याची सवय होती. यासोबतच तो नियमितपणे धूम्रपान करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी व्यक्त केली आहे. तथापि, शवविच्छेदन अहवाल व वैद्यकीय तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेची नोंद अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अपमृत्यू म्हणून करण्यात आली असून, सर्व शक्यतांचा विचार करून तपास सुरू आहे. त्यामुळे या तरुणाचा मृत्यू नैसर्गिक होता की, अन्य कारणांमुळे झाला, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)

अनधिकृत लॉज, रिसॉर्ट आणि फार्म हाऊसचा प्रश्न ऐरणीवर

विशेष म्हणजे वसई तालुक्यातील समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात अनधिकृत लॉज, रिसॉर्ट आणि फार्म हाऊस असून त्यामध्ये हुक्का, अमली पदार्थ सेवन, तसेच विनापरवाना मद्य विक्री आणि सेवन यासारखे अनेक अवैध व्यवसाय सुरू असतात. परंतु त्यांच्यावर पोलिसांकडून आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई न करता एक प्रकारे पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणानंतर आता तरी पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारच्या अनधिकृत लॉज रिसॉर्ट आणि फार्म हाऊसची झाडाझडती घेऊन योग्य कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com