मनोज सातवी, प्रतिनिधी
International Women's Day : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. महिला किती महत्त्वाच्या आहेत हे दाखवलं जात आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. महिलेचं कर्तृत्व, तिने केलेल्या त्यागासाठी आभार मानले जात आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. वसईतून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. वसई पूर्वेतील वसंतनगरी सिग्नल परिसरात अंदाजे १५ ते २० दिवसांची नवजात मुलगी पिशवीत टाकलेल्या अवस्थेत आढळून आली आहे.
जन्मजात मुलीला वाऱ्यावर सोडलं...
माणिकपूर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपाई पल्लवी नरवाडे यांना कर्तव्यावर असताना हे अर्भक दिसून आलं. परिसरातील नागरिकांकडे चौकशी करूनही बाळाबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. पोलिसांकडून बाळाला सोडणाऱ्या निर्दयी मातेचा शोध सुरू आहे. पोलिसांनी तातडीने त्या निष्पाप नवजात बाळाला सर डी. एम. पेटीट रुग्णालय, वसई पश्चिम येथे उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने बाळाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील काळजी आणि कार्यवाहीसाठी बाळाला उमराळे येथील बालकल्याण समितीसमोर सादर करण्यात आले आहे.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात नवजात बाळाचा परित्याग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून माणिकपूर पोलीस पुढील तपास करत आहेत. महिला दिनी घडलेल्या या घटनेमुळे समाजात संवेदनशीलता उरली नाही का असा सवाल विचारला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world