जाहिरात

MG EV Car Accident CCTV: ईव्ही चालवणाऱ्यांनो सावध व्हा! ब्रेक आपोआप निघाला, गाडीचा डेंजर अपघात

MG ZS EV Car Accident in Vasai: डॉ.मिश्रा हे गाडीत आपल्या पत्नीची वाट पाहत होते. त्यांची गाडी न्यूट्रलवर होती आणि हँडब्रेकही लावलेला होता.

MG EV Car Accident CCTV: ईव्ही चालवणाऱ्यांनो सावध व्हा!  ब्रेक आपोआप निघाला, गाडीचा डेंजर अपघात
वसई:

मनोज सातवी

वसई येथील सन सिटी परिसरात एका डॉक्टरचा आणि त्याच्या पत्नीचा डेंजर अपघात झाला आहे. मिथिलेश मिश्रा असं या डॉक्टरचे नाव असून त्यांच्याकडे  MG ZS EV टॉप मॉडेल ही कार आहे. डॉ.मिश्रा यांच्यासोबत झालेल्या प्रकारामुळे संपूर्णपण ऑटोमॅटीक असलेल्या ईव्ही एमजी कारच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डॉक्टर मिथिलेश मिश्रा आणि त्यांची पत्नी त्यांच्या पूर्णपणे ऑटोमॅटिक MG ZS EV टॉप मॉडेल कारमधून बाहेर जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्या गाडीची सिस्टम अचानक फेल झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असा आरोप करण्यात येत आहे.

( नक्की वाचा: मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर अन् गारेगार; रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली मोठी अपडेट )

नेमकं झालं काय?

हा प्रकार सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडला. डॉक्टर मिश्रा आपल्या बायकोसोबत बाहेर जेवायला निघाले होते. डॉ.मिश्रा हे गाडीत आपल्या पत्नीची वाट पाहत होते. त्यांची गाडी न्यूट्रलवर होती आणि हँडब्रेकही लावलेला होता. पत्नी गाडीत बसल्यानंतर गाडी ड्रायव्हिंग मोडवर टाकण्यासाठी ब्रेक रिलीज होत नव्हता. मिश्रा यांनी बराचवेळ ब्रेक काढण्यासाठी प्रयत्न केला. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून काही सेकंद ही गाडी जागीच उभी असल्याचे दिसून आले आहे. मिश्रा यांनी सांगितले की गाडीचा ब्रेक आपोआप निघाला आणि गाडीने प्रचंड वेग घेतला. गाडी थेट इमारतीच्या भिंतीवर आदळली आणि जागीच उलटली.

( नक्की वाचा: नागपूर-पुणे स्लीपर वंदे भारत रेल्वेचा मुहूर्त ठरला )

गाडीने तरुणाला चिरडलंच असतं

ही कार भिंतीला धडकत असताना गाडीच्या समोरून एक तरुण जात होता. मिश्रा यांची अनियंत्रित झालेली कार या तरुणाला चिरडू शकली असती. मिश्रा यांनी सांगितले की स्टेअरींग डावीकडे वळवल्याने त्या तरुणाचा जीव वाचला. मात्र कार भिंतीला धडकून उलटली आणि मिश्रा दाम्पत्य आतच अडकले होते.  गाडी इतक्या वेगाने धडकल्यानंतरही एकही एअरबॅग उघडली नाही आणि दरवाजेही उघडले नाहीत, ज्यामुळे डॉक्टर दांपत्य गाडीत काही काळ अडकले. स्थानिक रहिवाशांनी गाडीचे सनरूफ तोडून त्यांना बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणीही जबरी जखमी झाले नाही.

गाडी बदलून देण्याची मागणी

या घटनेमुळे संतापलेल्या डॉ. मिश्रा यांनी MG मोटर्सवर गंभीर आरोप केले आहेत. अशा अपूर्ण आणि असुरक्षित यंत्रणेसह गाड्या रस्त्यावर कशा येतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी सरकारनेही या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.  डॉ. मिश्रा यांनी कंपनीकडे गाडी बदलून देण्याची मागणी केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com