लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी न मिळाल्यामुळे काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. आपला राजीनामा सादर करताना वसंत मोरे यांनी स्थानिक मनसे नेत्यांच्या राजकारणाला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचं सांगितलं. नंतरच्या काळात वसंत मोरे हे लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक होते. यासाठी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या भेटीही घेतल्या. परंतु त्यांच्या पदरी अपयशच आलं. अखेरीस महाविकास आघाडीची साथ सोडून स्वतंत्रपणे मैदानात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरेंना पुण्याच्या जागेवर लढायची संधी दिली.
वसंत मोरेंच्या उमेदवारीमुळे पुण्याच्या जागेवर तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार आणि सध्याचे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर, भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे यांच्यात आता तिरंगी लढत होणार आहे. कसब्याची पोटनिवडणुक लढवून बाजी मारलेले धंगेकर, महापालिकेच्या माध्यमातून दांडगा जनसंपर्क असलेले मोहोळ आणि आपल्या धडाकेबाज स्टाईलने लोकांच्या मनात घर केलेल्या वसंत मोरे या तिघांचाही पुण्यात एक चाहता वर्ग आहे. त्यामुळे पुण्याची निवडणुक यंदा रंगतदार होणार आहे.
अवश्य वाचा - जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीतले सूर्याजी पिसाळ - आनंद परांजपेंची टीका
जितेंद्र आव्हाडांची वसंत मोरेंच्य उमेदवारी शंका -
परंतु राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वसंत मोरे यांच्या उमेदवारीवर बोट ठेवत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. वसंत मोरे आणि वंचित हे गणितचं मला समजतं नाही. वसंत मोरे नेमका काय कलाकार आहे आणि यांची कलाकारी मला समजलीच नाही. ते मला माझ्यापेक्षा मोठे कलाकार वाटतात अशी बोलकी प्रतिक्रीया जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
वसंत मोरेंना लढताना कधी पाहिलं?
प्रकाश आंबेडकरांनी वसंत मोरेंना लढताना कधी पाहिलं? कुठल्या आंदोलनात ते होते, दलितांना वाचवताना प्रकाश आंबेडकरांनी वसंत मोरेंना कधी पाहिलं? असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला. रविंद्र धंगेकर यांची मतं कमी करण्यासाठी आणि भाजपच्या मुरलीधर मोहोळांची मुरली वाजवण्यासाठी ही उमेदवारी वसंत मोरेंना दिली आहे का असा संशय येत आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
यापुढे बोलत असताना आव्हाड यांनी कदाचीत प्रकाश आंबेडकर हे वसंत मोरे यांना ओळखतही नसतील असही आव्हाड म्हणाले. परंतु असं असलं तरीही यंदा दलित आणि मुस्लीम जनता ही अत्यंत हुशारीने मतदान करेल असं आव्हाड यांनी स्पष्ट केलं.
अवश्य वाचा - लोकसभा निवडणूक - प्रकाश आंबेडकरांचं 'प्रेशर' कोणावर? 'या' चिन्हावर लढणार निवडणूक