भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्याआधी भाजपच्या नव्या अध्यक्षपदासाठीच्या नेत्यांची चाचपणी पक्षाकडून सुरु करण्यात आली आहे. निवडणुकीच्या आधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेने आता राष्ट्रीय निवड अधिकारी आणि प्रदेश घटक समन्वयासाठी केंद्रीय पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत.
उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही मोठ्या राज्यांचे केंद्रीय पर्यवेक्षक बनवून विनोद तावडे यांच्याबाबत भाजपने मोठा संकेत दिला आहे. उत्तर प्रदेश संघटना प्रभारी राहिलेले अमित शाह आणि जेपी नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. त्याच उत्तर प्रदेश आणि बिहारचे केंद्रीय पर्यवेक्षक विनोद तावडे हे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
(नक्की वाचा- राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? मविआच्या मोठ्या नेत्याकडून प्रयत्न सुरू)
राज्यात निवडणुकीच्या एकदिवस आधी विनोद तावडे हे पैसे वाटण्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले होते. मात्र विरोधकांचं हे षडयंत्र म्हणत विनोद तावडे यांनी पलटवार केला होता. सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांना विनोद तावडे यांनी मानहानीची नोटीस देखील पाठवली. या सर्व राजकीय घडामोडींचा भाजपला फायदा झाल्याचं देखील बोललं जात आहे.
भाजपचे राष्ट्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश यांच्यावर मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मधील केंद्रीय पर्यवेक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवप्रकाश यांचे सहाय्यक म्हणून सरोज पांडेय, गजेंद्र सिंह पटेल आणि अरविंद मेनन यांची नियुक्ती करण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामंत्री सुनील बन्सल यांना पश्चिम बंगाल, आसाम, झारखंड आणि हरियाणाचे केंद्रीय पर्यवेक्षक बनवण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत संजय जयस्वाल, अमित मालवीय आणि राजू बिस्ट यांची सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
(नक्की वाचा - ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? पराभूत उमेदवारांच्या बैठकीत काय घडलं?)
सौदान सिंह यांची हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडच्या पर्यवेक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत श्रीकांत शर्मा, राजकुमार चाहर आणि सतीश पुनिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महासचिव तरुण चुग यांना केरळ, तामीळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक आणि लक्षद्वीप येथील पर्यवेक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचे सहाय्यक म्हणून नलिन कटील, पोन राधाकृष्णन, वानति श्रीनिवास असणार आहेत. राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंह यांना महाराष्ट्र, गोवा, दमन द्वीप आणि दादर नगर हवेली येथील जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामंत्री राधामोहन दास अग्रवाल यांना राजस्थान, पंजाब, चंदीगड आणि गुजरात येथील पर्यवेक्षक बनवलं आहे. त्यांचे सहाय्यक म्हणून ऋतुराज सिन्हा, अश्विनी शर्मा नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामंत्री दुष्यंत गौतम यांची ओडिशा, अंदमान आणि निकोबारचे पर्यवेक्षक बनवण्यात आले आहे. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्यासोबत संजीव चौरसिया, संजय भाटिया आणि लाल सिंह आर्य हे सहाय्यक म्हणून असतील.
(नक्की वाचा - अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना पसंती का आहे? 3 कारणं)
आतापर्यंत देशभरातील भाजप संघटनेत बूथ अध्यक्षांच्या निवडणुका होत होत्या आणि आता मंडल अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरातील भाजप मंडल अध्यक्षांची निवडणूक 15 डिसेंबरपर्यंत तर जिल्हाध्यक्षांची निवडणूक 30 डिसेंबरपर्यंत होणार आहे. यानंतर प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी दिल्लीत एक मोठी कार्यशाळा आयोजित केली जाईल. ज्यामध्ये प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीची कालमर्यादा निश्चित केली जाईल. जानेवारीअखेरीस प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुका पूर्ण होतील, असे मानले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक फेब्रुवारीच्या अखेरीस म्हणजेच दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world