जाहिरात

Virar News: गर्भाशयातून बाळ थेट जमिनीवर कोसळले; जखमी बाळावर उपचार सुरू, विरारमधील खळबळजनक घटना

Virar News: विरार पश्चिमेकडील 'जोळेकर मॅटर्निटी होम'मध्ये डॉक्टर आणि नर्सेसच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.

Virar News: गर्भाशयातून बाळ थेट जमिनीवर कोसळले; जखमी बाळावर उपचार सुरू, विरारमधील खळबळजनक घटना

वसई-विरार खाजगी रुग्णालयाचा अक्षम्य निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे. विरार पश्चिमेकडील अत्यंत प्रसिद्ध मानल्या जाणाऱ्या 'जोगळेकर मॅटर्निटी होम' या प्रसूतिगृहात डॉक्टर आणि परिचारिकांच्या (नर्सेस) निष्काळजीपणामुळे एक भयंकर अपघात घडला आहे. प्रसूतीदरम्यान योग्य ती खबरदारी न घेतल्याने महिलेच्या गर्भाशयातून बाळ अडीच ते तीन फुटांवरून थेट जमिनीवरील फरशीवर कोसळले.

या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेत नवजात बाळ गंभीर जखमी झाले असून, त्याला अत्यंत नाजूक स्थितीत ठाण्यातील बाल रुग्णालयामध्ये 'NICU' मध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण वसई-विरार परिसरात नागरिकांमधून प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

नेमकी काय घडली घटना?

पीडित महिलेला सातवा महिना लागून अवघे दोनच दिवस झाले असताना गुरुवारी तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला तात्काळ विरार पश्चिमेकडील जोगळेकर प्रसूतिगृहात दाखल केले. पीडित महिलेने आणि तिच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयातील नर्सेस व डॉक्टरांना "बाळ बाहेर येत आहे, वेदना प्रचंड असह्य होत आहेत, तातडीने मदत करा" अशी वारंवार विनवणी केली.

(नक्की वाचा-  Virar News: चिमुकलीवरून सासरे आणि सुनेमध्ये जोरदार वाद; रागाच्या भरात पुढे भयंकर घडलं)

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी व डॉक्टरांनी या अत्यंत गंभीर परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि वेळ काढूपणा केला. पीडित महिलेला प्रचंड वेदना होत असताना आणि तिला साधे उभे राहण्याचीही क्षमता नसताना, रुग्णालयाने स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर न देता तिला चालवत नेण्याचा अघोरी प्रयत्न केला. "धीर धरा, काही होत नाही" असे सांगत परिचारिकांनी महिलेचे पाय घट्ट मुडपण्याचा प्रयत्न केला.

प्रसूती कक्षाच्या दारातच घडला भयंकर अपघात

पीडित महिला कशीबशी प्रसूती कक्षाच्या दाराजवळ पोहोचली असता, डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गर्भाशयातून बाळ थेट बाहेर आले आणि अडीच ते तीन फुटांच्या उंचीवरून थेट कडक फरशीवर पडले.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रसूती कक्षाबाहेर उपस्थित असलेले नातेवाईक हादरून गेले. जमिनीवर आपटल्यामुळे बाळाच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. परिस्थिती बिघडल्याचे लक्षात येताच रुग्णालयाने घाईघाईने बाळाला पुढील उपचारासाठी ठाणे येथील NICU सेंटरमध्ये हलवले, जिथे सध्या बाळावर मृत्यूशी झुंज सुरू आहे.

(नक्की वाचा-  Yavatmal News: डोळ्यासमोर बायकोसह 2 मुली वाहून गेल्या; झाडामुळे चालक वाचला; यवतमाळमध्ये पुराचा हैदोस!)

कडक कारवाईची आणि गुन्हे दाखल करण्याची मागणी

वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या प्रकारामुळे वसई-विरारमधील खाजगी प्रसूतिगृहांच्या सुरक्षेवर आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पीडित महिलेच्या कुटुंबाने आणि स्थानिक नागरिकांनी याप्रकरणी तीव्र रोष व्यक्त केला आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित डॉक्टर आणि नर्सेसवर तत्काळ गुन्हे दाखल करून जोगळेकर मॅटर्निटी होमवर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com