राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai Mayor News : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाचा आता या निवडीबाबतची तारीख अखेर निश्चित करण्यात आली आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महानगरपालिकेचा नवीन महापौर विराजमान होणार आहे. नवनिर्वाचित महापौर हा नवी मुंबई शहराचा तेरावा महापौर असणार आहे. या महापौर निवड प्रक्रियेसाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
यंदा महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असून माधुरी सुतार आणि नेत्रा शिर्के या नगरसेविकांची नावे महापौर पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.महापौर पदाबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेते व वनमंत्री गणेश नाईक हे घेणार आहेत. त्यांनी सुचवलेला उमेदवारच नवी मुंबईचा महापौर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महापौरपदाबाबतचा अंतिम निर्णय कोण घेणार?
दरम्यान, महापौरपदाबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते व वनमंत्री गणेश नाईक घेणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यांच्या सूचनेनुसार ठरलेला उमेदवारच नवी मुंबईचा महापौर होणार,अशी चर्चा सध्या रंगली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून शहराच्या राजकारणावर गणेश नाईक यांचे वर्चस्व राहिले आहे. मागील जवळपास 30 वर्षांपासून त्यांनी नवी मुंबईतील सत्तेचा किल्ला भक्कमपणे सांभाळला आहे.
नक्की वाचा >> पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये नेमका फरक काय? पैसे मिळतात का? सर्व माहिती वाचा
या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, मात्र या राजकीय संघर्षात नवी मुंबईकरांनी पुन्हा एकदा गणेश नाईक यांनाच पसंती दिल्याचे चित्र निवडणूक निकालातून स्पष्ट झाले. आता येणाऱ्या काळात गणेश नाईक यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कशी होते, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. विशेषतः पाणीटंचाईचा प्रश्न, सिडकोच्या घरांचा मुद्दा तसेच भाजपने जाहीर केलेल्या नवी मुंबईसाठीच्या वचननाम्यातील विकासकामे प्रत्यक्षात कधी आणि कशा पद्धतीने पूर्ण होतात, यावर आगामी महापौर कार्यकाळाचे मूल्यमापन होणार आहे.
नक्की वाचा >> अकोल्यात कोण होणार महापौर? इच्छुकांची मांदियाळी, भाजपच्या 'या' 5 उमेदवारांची नावं आघाडीवर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world