राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट का घेतली असावी याबाबत अनेक तर्क समोर येत आहे. मात्र ही भेट कशासाठी होती याबाबतची अधिकृत माहिती छगन भुजबळ आणि शरद पवार हेच देऊ शकतात.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत आहेत. वंचित किंवा इतर घटकांना ते सोबत घेतील अशी चर्चा सुरु आहे. यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाल्याचे कळते. या अस्वस्थेतून भुजबळ शरद पवारांच्या भेटीला आल्याची माहिती मिळत आहे.
( नक्की वाचा- 'बघून येतो...' बोलून गेलेले भुजबळ वर्षभराने शरद पवारांच्या भेटीला, तो फोनचा किस्सा पुन्हा चर्चेत)
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून तिकीट मिळावं अशी छगन भुजबळांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले होते. छगन भुजबळ यांच्या आग्रहामुळेच हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित करण्यासही उशीर झाला होता. त्यानंतर राज्यसभेचे तिकीट देखील छगन भुजबळ यांना नाकारण्यात आले होते. यामुळेच छगन भुजबळ महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे.
(नक्की वाचा - भुजबळ भाषणाला उभे राहीले, मराठा समाजाने काय केले? दादांच्या बारामतीत काय झाले?)
मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्यावरुनही छगन भुजबळ महायुती नाराज असल्याची चर्चा आहे. याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत छगन भुजबळ हे शरद पवारांसोबत चर्चेसाठी गेले असावेत, अशी चर्चा आहे.
शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीचे असे अनेक अर्थ काढले जात आहेत. मात्र या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.