जाहिरात
This Article is From Jul 29, 2024

पुणेकर चिंतेत! झिका विषाणूमुळे पुण्यात दोघांचा मृत्यू; रुग्णसंख्या वाढली! 

पुण्यात झिका विषाणूची (Zika virus in Pune) लागण झालेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा पुण्यात मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

पुणेकर चिंतेत! झिका विषाणूमुळे पुण्यात दोघांचा मृत्यू; रुग्णसंख्या वाढली! 
पुणे:

पुण्यात झिका विषाणूची (Zika virus in Pune) लागण झालेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा पुण्यात मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. रविवारी पुण्यात झिकाचे आठ रुग्ण (Pune zika death) आढळून आले आहेत. त्यामुळे आता शहरातील एकूण रूग्णसंख्या 45 वर पोहोचली आहे. 

झिका विषाणूची लागण झालेल्या दोन्ही ज्येष्ठ नागरिकांना हृदय आणि यकृताचा आजार होता. त्यामुळे या दोघांचा मृत्यू झिकामुळे झाला किंवा इतर गुंतागुंत कारणीभूत असल्याची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुढील विश्लेषणासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीला पत्र लिहिलं आहे. 

नक्की वाचा - पुणेकरांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे; धरणांमधील पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता

मृत झालेल्या वृद्ध व्यक्तीचं वय 71 पेक्षा जास्त आहे. यापैकी एका रुग्णाला सह्याद्री रुग्णालयात तर दुसऱ्या रुग्णाला वारजे येथील जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जोशी रुग्णालयात 14 जुलै रोजी उच्च रक्तदाबासह आरोग्यविषयक समस्यांमुळे मृ्त्यू झाला. 19 जुलै रोजी त्यांना झिका विषाणूचं निदान झालं होतं. खराडी येथील रूग्णाचे अनेक अवयव निकामी झाल्याने सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आलं. 21 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना 23 जुलै रोजी झिका झाल्याचे निदान झाले. रविवारी शहरात नोंद झालेल्या आठ नवीन रुग्णांमध्ये दहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.

झिकापासून कसा कराल बचाव?
- झिका विषाणू डासांपासून होतो, त्यामुळे डासांपासून स्वत:चा बचाव कराल. 
- घरात आणि आजूबाजूच्या परिसरात डासांची पैदास होणारी ठिकाणं काढून टाकावी.
- भरपूर पाणी प्यावं आणि स्वत:ला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com