जाहिरात

IPL Playoffs | मुंबईसाठी चिंतेचे ढग पण 'तो' योगायोग जुळून आल्यास 'हिटमॅन' शर्मा ठरु शकतो तारणहार

आयपीएलच्या प्लेऑफ्समध्ये रोहित शर्माची आकडेवारी ही फारशी चांगली नाहीये. आतापर्यंतच्या इतिहासात प्लेऑफ्सच्या 21 इनिंगमध्ये रोहितच्या नावावर 316 धावा जमा आहेत. यात त्याची सरासरी ही अवघी 15.80 ची आहे.

IPL Playoffs | मुंबईसाठी चिंतेचे ढग पण 'तो' योगायोग जुळून आल्यास 'हिटमॅन' शर्मा ठरु शकतो तारणहार
फोटो सौजन्य - BCCI
मुंबई:

IPL 2025 च्या प्लेऑफ्सच्या पहिल्या पात्रता सामन्यात RCB ने पंजाब किंग्जचा धुव्वा उडवत मोठ्या थाटात अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. फॉर्मात असलेल्या पंजाबला अजुनही अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. आज होणाऱ्या गुजरात विरुद्ध मुंबई सामन्यातील विजेत्या संघासोबत पंजाबचा संघ दुसरा क्वालिफायर सामना खेळेल. परंतु पहिले खराब सुरुवात आणि मध्यावधीत चांगली लय पकडलेल्या मुंबई इंडियन्स संघासमोर एलिमिनीटेर सामन्यात मोठं आव्हान असणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सूर्यकुमार यादवचा अपवाद वगळता मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला अद्याप सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाहीये. त्यातच संघाचा महत्त्वाचा फलंदाज रोहित शर्मा हा देखील सध्या आपल्या फॉर्मशी झुंज देतो आहे. आयपीएलच्या इतिहासाचा विचार केला तर प्लेऑफ्स सामन्यातली रोहितची आकडेवारी ही मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारीच आहे. परंतु यादरम्यान जुळून आलेला एक योगायोग जर आजच्या सामन्यात जुळून आला तर मुंबईचा संघ गुजरातला धक्का देऊ शकतो.

आतापर्यंत रोहित शर्मासाठी कसा राहिला आहे आयपीएलचा हंगाम?

रोहितसाठी आयपीएलचा यंदाचा हंगाम हा संमिश्र स्वरुपाचा राहिला आहे. 13 इनिंगमध्ये रोहितने 27.41 ची सरासरी आणि 147.53 च्या स्ट्राईक रेटने 329 धावा केल्या आहेत. यात रोहित शर्माच्या नावावर तीन अर्धशतकांचाही समावेश आहे. चेन्नईविरुद्ध सलामीच्या सामन्यात रोहित शर्मा भोपळाही न फोडता माघारी परतला. त्यानंतर उर्वरित सात सामन्यांमध्येही त्याचा हा खराब फॉर्म कायम राहिला.

उर्वरित टप्प्यात चेन्नईविरुद्ध सामन्यातच रोहितला गवसला सूर -

परंतू रोहितला आपल्या संघाच्या लौकिकाला साजेसा उर्वरित टप्प्यात सूर गवसला. चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने 45 बॉलमध्ये नाबाद 76 धावा केल्या. यानंतर रोहितने सनराईजर्स हैदराबाद आणि राजस्थानविरुद्ध सामन्यात अर्धशतक झळकावलं परंतु यानंतर पुन्हा त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ आटत गेला.

हे ही वाचा - MI vs GT : मुंबई इंडियन्सच्या दोन दिग्गज खेळाडूंनी बांधली गुडघ्याला पट्टी, हार्दिकची डोकेदुखी वाढली

प्लेऑफ्सची आकडेवारी आणि 'तो' योगायोग -

आयपीएलच्या प्लेऑफ्समध्ये रोहित शर्माची आकडेवारी ही फारशी चांगली नाहीये. आतापर्यंतच्या इतिहासात प्लेऑफ्सच्या 21 इनिंगमध्ये रोहितच्या नावावर 316 धावा जमा आहेत. यात त्याची सरासरी ही अवघी 15.80 ची आहे.

हे ही वाचा -  Rohit Sharma : रोहित शर्माची खास विनंती मान्य, बीसीसीआयकडून जुन्या सदस्याचा टीम इंडियात समावेश!

आतापर्यंत रोहित शर्माने प्ले-ऑफ्सच्या सामन्यांमध्ये फक्त दोनवेळा अर्धशतक झळकावलं आहे. 2015 आणि 2020 या दोन वर्षांत रोहितने अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावून आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिलं आहे. यंदाच्या वर्षात मुंबईचा संघ अद्याप अंतिम सामन्यात पोहचलेला नसला तरीही 5-5 वर्षांच्या फरकाने रोहितने केलेली ही कामगिरी जर यंदाही केली तर मुंबईचा संघ गुजरातला मात देऊ शकतो.

फक्त आयपीएलच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांतही रोहितने गेल्या काही वर्षांत मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी करत आपल्या संघाची बाजू वरचढ ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे रायन रिकल्टन आणि विल जॅक्स या दोन महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत जॉनी बेअरस्टो या नव्या शिलेदाराच्या साथीने रोहितसोबत जर जुना योगायोग पुन्हा जुळून आला तर मुंबईच्या संघासाठी ती नक्कीच चांगली गोष्ट ठरु शकते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com