जाहिरात
Story ProgressBack

रोहित शर्माची शतकी इनिंग व्यर्थ, 20 रन्सनी चेन्नई ठरली 'सुपरकिंग'

Read Time: 3 min
रोहित शर्माची शतकी इनिंग व्यर्थ, 20 रन्सनी चेन्नई ठरली 'सुपरकिंग'
रोहितची शतकी खेळी व्यर्थ (फोटो सौजन्य - IPL)
मुंबई:

आयपीएलच्या इतिहासात दोन दिग्गज संघांमधलं द्वंद्व पुन्हा एकदा चेन्नई सुपरकिंग्जने जिंकलं आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने 20 धावांनी बाजी मारत गुणतालिकेत अव्वल चार मध्ये आपलं स्थान कायम राखलं. चेन्नईकडून महेंद्रसिंह धोनीने शेवटच्या चार बॉलमध्ये केलेली फटकेबाजी निर्णयाक ठरली. मुंबईकडून रोहित शर्माने आयपीएलमधलं आपलं दुसरं शतक झळकावलं. परंतु पथिराणाने मोक्याच्या क्षणी विकेट घेत मुंबईला धक्के देत त्यांचं विजयाचं स्वप्न पुरं होऊ दिलं नाही.

नाणेफेक जिंकून मुंबईची प्रथम गोलंदाजी, चेन्नईची खराब सुरुवात - 

RCB विरुद्ध सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करताना मिळालेल्या यशामुळे हार्दिक पांड्याने चेन्नईविरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. चेन्नईने मुंबईचं मैदान पाहून अजिंक्य रहाणेला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा हा निर्णय फसला. कोएत्झीने अजिंक्यला झटपट बाद केलं. यानंतर रचिन रविंद्र आणि ऋतुराज गायकवाड यांची भागीदारी जमली. कर्णधार ऋतुराजने आक्रमक पवित्रा आजमावत काही सुरेख फटके खेळले.

दोघांनाही दुसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. या भागीदारीत रचिन रविंद्र संथ खेळत होता. अखेरीस श्रेयस गोपाळने रविंद्रला बाद करत चेन्नईला दुसरा धक्का दिला.

अवश्य वाचा - लखनऊच्या जखमेवर KKR चं 'सॉल्ट', 8 विकेट राखून जिंकला सामना

मुंबईच्या गोलंदाजांना थकवण्यात चेन्नईला यश -

यानंतर ऋतुराज गायकवाडने शिवम दुबेच्या साथीने पुन्हा एकदा चेन्नईच्या डावाला आकार दिला. शिवमच्या साथीने ऋतुराजने आपलं अर्धशतक साजरं केलं. दुसऱ्या बाजूने आपल्या कर्णधाराला मोठे फटके खेळताना पाहून शिवम दुबेही मोठे फटके खेळायला लागला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी  90 धावांची भागीदारी केली. अखेरीस कर्णधार हार्दिक पांड्याने ऋतुराज गायकवाडला बाद केलं. ऋतुराजने 40 बॉलमध्ये 5 फोर-सिक्स लगावत 69 धावा केल्या.

अवश्य वाचा - लोकं पुन्हा हार्दिक पांड्यावर प्रेम करतील - इशान किशन

यानंतरही चेन्नईच्या फलंदाजांनी मागे वळून पाहिलंच नाही. वानखेडेच्या मैदानाचा फायदा घेत शिवम दुबेनेही अखेरपर्यंत मैदानात टिकून राहत आपलं अर्धशतक झळकावलं. त्याला डॅरेल मिचेलने आणि अखेरच्या षटकात धोनीने उत्तम साथ दिली. शिवम दुबेने 38 बॉलमध्ये 10 फोर आणि 2 सिक्स लगावत नाबाद 66 रन्स केल्या. धोनीने नाबाद 20 तर मिचेलने 17 रन्स केल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्याने 2 तर कोएत्झी आणि श्रेयस गोपाळने १-१ विकेट घेतली.

मुंबईची आक्रमक व आश्वासक सुरुवात -

द्विशतकी धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईने आपल्या डावाची आश्वासक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि इशान किशनने फटकेबाजी करत पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. ही जोडी चेन्नईसाठी डोकेदुखी ठरत असतानाच मथीशा पथिराणाने आपल्या एकाच षटकात इशान किशन आणि सूर्यकुमार यादवला माघारी धाडलं. एकाच षटकात बसलेल्या या दोन धक्क्यांमुळे मुंबईचा संघ बॅकफूटवर गेला.

तिलक वर्माची रोहितला चांगली साथ -

यानंतर मुंबईची धावगती मंदावली असली तरीही तिलक वर्माने रोहित शर्माला उत्तम साथ दिली. तिलकच्या साथीनेच रोहितने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. मैदानात जम बसवल्यानंतर दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. ही जोडी मैदानात टिकल्यानंतर मुंबईने पुन्हा विजयासाठी प्रयत्न सुरु केले. परंतु तेव्हाच पथिराणाने तिलक वर्माला बाद केलं.

पथिराणाचे दणके आणि मधल्या फळीची निराशा -

यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार हार्दिक पांड्याने सपशेल निराशा केली. अवघ्या 2 रन्स काढून तो तुषार देशपांडेच्या बॉलिंगवर बाद झाला. टीम डेव्हीडने दोन षटकार खेचत सामन्यात रंगत निर्माण केली खरी, परंतु तो देखील हाणामारीच्या नादात बाद झाला. यानंतर मथिराणाने पुन्हा एकदा चेन्नईचं काम सोपं करत धोकादायक ठरु पाहणाऱ्या पथिराणाची दांडी गुल केली.

यानंतर सामना मुंबईच्या हातातून निसटला होता. मोहम्मद नबीच्या साथीने रोहित शर्माने आपलं शतक पूर्ण केलं खरं, परंतु संघाला विजय मिळवून देण्यात त्याचे प्रयत्न कमीच पडले. 20 धावांनी बाजी मारत चेन्नईने या पारंपरिक द्वंद्वात बाजी मारली. चेन्नईकडून पथिराणाने 4 विकेट घेतल्या. त्याला मुस्तफिजूर आणि तुषार देशपांडेने 1-1 विकेट घेत चांगली साथ दिली. मुंबईकडून रोहित शर्माने 63 बॉलमध्ये 11 चौकार आणि 5 षटकार लगावत नाबाद 105 धावा केल्या. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination